गंभीर जळालेल्या “त्या” महिलेचे निधन ; मालवण हळहळलं

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना घेतला अखेरचा श्वास ; संशयिताचा शोध सुरु

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण बस स्थानकासमोरील केजी डायग्नोस्टिक सेंटर या लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रीती केळूसकर या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली होती. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना तिचे निधन झाले आहे. या घटनेमुळे मालवण हळहळलं आहे. दरम्यान, या महिलेच्या पहिल्या नवऱ्याने तिला पेटवल्याचा आरोप असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

धुरीवाडा येथील प्रीती केळूसकर ही 34 वर्षीय महिला मालवण बस स्थानकातील लॅब मध्ये कामाला होती. तिचे धुरीवाडा येथील एका व्यक्ती सोबत लग्न झाले होते. मात्र त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेने अलीकडे काही महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. या रागातून तिच्या पहिल्या नवऱ्याने आज दुपारी ती काम करत असलेल्या लॅब मध्ये येऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतून हातातील लायटरने तिला आग लावली. त्यानंतर तो पळून गेला. पेटलेल्या अवस्थेत ही महिला रस्त्यावर येताच परिसरातील नागरिक हादरून गेले. त्यांनी धावाधाव करून या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री तिचे निधन झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!