RajkotNews : सा. बां. कडून पुन्हा एकदा कोट्यावधीचा चुराडा करण्याचे काम ; मात्र यापुढे कामात हलगर्जीपणा झाला तर…
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा इशारा ; जिल्ह्यात सुरु असलेली सर्वच कामे निकृष्ट, कारवाईची मागणी
मालवण : नौसेना दिनाचा कार्यक्रम मालवणात झाला आणि ह्या कार्यक्रमात आपली पाठ थोपटून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौसेना यांच्या संगनमताने झालेल्या निकृष्ट कामाचा घाव हा सर्व शिवप्रेमीना बसला आहे. आता पुन्हा कोट्यवधीचा चुराडा करण्याचा घाट पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आहे. परंतु त्यांनी फक्त एकच गाठ मारुन ठेवावी की पुन्हा कामात काही हलगर्जीपणा झाला तर कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिला आहे. हाच शहाणपणा जर त्यावेळी दाखवला असता तर ही वेळ ओढवली नसती. आम्हाला कोणत्याही परिस्थितीच राजकारण करायचं नाहीये. परंतु त्यावेळी नको ती घाईगडबड करुन शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याच काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौसेनेच्या वतीने करण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे, त्याचा सुद्धा एकदा पालकमंत्र्यांनी आढावा घ्यावा. रस्त्याचे डांबरीकरण रात्रीच्या वेळी सुद्धा करण्यात आले होते. त्यावेळी हे खात्याचे अधिकारी झोपले होते का? त्यामुळे सध्या जिल्ह्यातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे त्याचा सुद्धा एकदा पालकमंत्र्यांनी आढावा घ्यावा. जिल्ह्यात होणारी सर्व कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची करण्याच काम सध्या सुरु आहे. त्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई संबंधितांवर करावी अशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आग्रही मागणी करत आहोत. लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती निदर्शनास आणून देणार आहोत.आणि त्यानंतरही काही कारवाई न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या १५ दिवसात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणेश वाईरकर यांनी दिला आहे.