भाजपा नेते निलेश राणेंकडून माजी खा. विनायक राऊताना “होमपीच”वर जोरदार धक्का
तळगाव उपसरपंचासह अनेक कार्यकर्ते भाजपात ; दहा वर्षात माजी खा. राऊतांकडून गावात विकासकामे झाली नसल्याची खंत
कुडाळ : शिवसेना ठाकरे गटाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांना त्यांच्या तळगाव गावात भाजपचे नेते निलेश राणे यांनी धक्का दिला आहे. येथील उपसरपंचासह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भाजपात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे.
तळगाव येथील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भेट घेतली आणि गेल्या दहा वर्षात तळगाव गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करून गावातील प्रत्येक वाडी मध्ये विकासाची गंगा गेली पाहिजे अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी करून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, जयवंत दळवी, चारुहास दळवी, मुरारी टेमकर, तळगाव ग्रामपंचायत सदस्य श्वेता पेडणेकर, धोंडी दळवी, सुरेंद्र दळवी, एकनाथ तळगावकर, केशव सहदेव तळगावकर, अशोक दळवी, केशव तळगावकर, विजय राऊळ, अशोक दळवी, राजू सावंत, महेश फाले, अरुण वालावलकर, सुधाकर तळगावकर, राजू राणे, सागर फाले यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजप प्रदेश सदस्य संध्या तेरसे, जगदीश चव्हाण, निलेश तेंडोलकर, विजय कांबळी आदी उपस्थित होते.
यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षांमध्ये तळगाव गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही म्हणूनच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या गावाचा विकास आम्ही निश्चित करून त्यांना अपेक्षित असलेला गावचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कधीही निराश होऊ देणार नाही. माजी खासदार विनायक राऊत यांना आपल्या गावात साधा विकास निधी आणता आला नाही म्हणूनच त्यांच्या पक्षातील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले