महिलांनी स्वतः मध्ये असणारी ताकद ओळखून संकटावर मात करावी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती संपूर्णा कारंडे यांचे प्रतिपादन ; मालवणात विधी सेवा समिती मार्फत महिला सक्षमीकरण कार्यक्रम
मालवण : महिलांनी स्वतः मध्ये असणारी ताकद ओळखून संकटावर मात कशी करावी, स्वसंरक्षण कसे करावे याबरोबरच महिला सक्षमी करणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन करत विधी सेवा समिती मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती संपूर्णा कारंडे यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष एच. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण कार्यक्रम येथील तालुका स्कूल येथे पार पडला. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण सचिव श्रीमती संपूर्णा कारंडे, सचिव, पॅनल विधीज्ञ ॲड. रुपेश परुळेकर, सहायक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, मुख्य सेविका स्नेहल गावडे, तसेच ॲड. प्राजक्ता गावकर, ॲड. सोनाली कुबल, लिपिक श्वेता सावंत हे उपस्थित होते. यावेळी संपूर्णा कारंडे यांनी महिलांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. ॲड. रुपेश परुळेकर यांनी महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण याबाबत माहिती दिली. तसेच महिलांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास तालुक्यातील अंगणवाडी सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या. ॲड. प्राजक्ता गावकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.