मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या करणार मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
गेली १७ वर्षे रखडलेला मुंबई – गोवा महामार्ग सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच राज्य सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे. गणेशोत्सव सण आता अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य सरकार विशेष दक्षता घेत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी २६ ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेणार आहेत.
सोमवारी दुपारी १२.०० वा. हा पाहणी दौरा सुरु होणार आहे. या दरम्यान पळस्पे-पनवेल, जिल्हा रायगड ते जिल्हा सिंधुदुर्ग दरम्यान ते महामार्गाचा पाहणी दौरा करणार आहेत. या पाहणी दौऱ्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग), तसेच वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्यासह पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित अधिकारी यांना उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.