VIDEO | निम का पत्ता कडवा है… रामदास कदम XXX है !
पालकमंत्र्यांवरील टिकेचे मालवणात पडसाद ; रामदास कदमांच्या पुतळ्याला भाजपाकडून जोडेमारो आंदोलन
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या टिकेचे आज मालवणात पडसाद उमटले. संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर रामदास कदमांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. ना. रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्याची रामदास कदम यांची लायकी नाही. यापुढे त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात टीका केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, जॉन नरोन्हा, सुधीर साळसकर, विजय कदम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, चिटणीस निशय पालेकर, अविनाश राऊत, बबलू राऊत यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यानंतर पोलिसांनी हा पुतळा ताब्यात घेतला.
यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर म्हणाले, शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदमांचे वक्तव्य युतीला बाधा पोहोचणारे आहे. ते ज्या मुंबई गोवा महामार्गावरून रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात बोलत आहेत, तो महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाला. पण रत्नागिरी आणि नजिकच्या जिल्ह्यात का पूर्ण होऊ शकला नाही, यांचे आत्मपरीक्षण रामदास कदम यांनी करावे, या महामार्गाचे काम थांबवण्यामागे त्यांचीच माणसे आहेत, ती कोण आहेत, ते त्यांनीच शोधून काढावे. तेथील माणसांना हाताशी धरून कोर्टात केसिस कोणी टाकल्या, आणि हे काम कोणी रखडवले हे शोधावे. वास्तविक मुंबई गोवा महामार्गाचे काम हे केंद्रीय एजन्सीचे आहे. पण रवींद्र चव्हाण यांनी जबाबदारी झिडकारली नाही. आपण कोकणचे सुपुत्र असल्याने आपल्या कोकणी माणसाला त्रास होऊ नये म्हणून ते स्वतः तन मन धन अर्पून महामार्ग पूर्ण होण्यासाठी काम करत आहेत. अशा नेत्यावर रामदास कदम यांच्यासारखे वाचाळवीर आरोप करतात. रामदास कदम यांची त्यांच्यावर आरोप करायची लायकी नाही. यानंतर अशी वक्तवे केली तर भाजपाचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, असे श्री. चिंदरकर म्हणाले.