सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये प्रतिभा, पण मार्गदर्शनाअभावी येथील मुले सैन्यदल भरतीत मागे
“एमआयटीएम” इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात मेजर प्रसाद लोट यांची खंत
मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी पुढे व्हावे : संस्थेचे विश्वस्त विनोद कदम यांचे प्रतिपादन
मालवण | कुणाल मांजरेकर
आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. पण योग्य मार्गदर्शनाअभावी आपल्या जिल्ह्यातील मुले भारतीय सैन्य दलात भरतीपासून मागे रहात असल्याची खंत भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर प्रसाद लोट यांनी एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांची संवाद साधताना व्यक्त केली.
सुकळवाड (ओरोस) येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये गोसेट आर्मी बीएचएम बटालियनचे मेजर प्रसाद लोट यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मेजर लोट यांनी आपल्या जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. आपला देश स्वतंत्र व्हावा, यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताची आहुती दिली. म्हणून हा दिवस आज आपल्याला दिसत आहे, असे सांगून त्यांनी थोर क्रांतिवीर भगतसिंग यांचा किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करण्यासाठी शरीराने तंदुरुस्त असणे फार आवश्यक आहे. तुम्ही देशाची युवा पिढी आहात, असे त्यांनी सांगून अग्नीवीर योजनेबद्दलही विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली
यावेळी संस्थेचे विश्वस्त विनोद कदम या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. यासाठी आपले पण योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेसच्या माध्यमातून आपण देशाची सेवा करू शकतो. प्रत्येक विद्यार्थी सक्षम असेल तर देशाचे नाव उज्वल करेल. जीवन विद्या मिशन या माध्यमातून आपल्या कॉलेजचे अनेक विद्यार्थी घडत असतात. त्याचप्रमाणे मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडतील. शिक्षणाच्या माध्यमातून देशसेवा करूया, असे आवाहन विनोद कदम यांनी केले
डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस व्ही ढणाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. त्यांनी त्यांच्या तत्वांशी कधीही तडजोड न करता आपल्या देशाचे एक प्रामाणिक जबाबदार नागरिक म्हणून जगावे. इंजिनीयर म्हणून देशाच्या विकासात योगदान द्यावे. नवीन शोध निर्माण करावेत वास्तविक जगातील समस्या सोडविण्यासाठी तुमची प्रतिभा वापरा. आपल्या देशाला उंचीवर नेणारे बदल घडवणारे उद्योजक आणि नेते बना. स्वातंत्र्य हे केवळ एका दिवसाचे नसून तो एक आत्मा आहे. तुमच्या मनात देशाविषयी भावना मूर्त करा आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करा, असे ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाविषयीची आपली भावना व्यक्त केली. समीक्षा जाधव, तन्वी परब या विद्यार्थ्यांनी नृत्यामार्फत देशाविषयीची भावना व्यक्त केली तर प्रथमेश माईलकर, शिवम परब, सिद्धी बिरमोळे यांनी देशभक्ती विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मेजर प्रसाद लोट, संस्थेचे विश्वस्त विनोद कदम, सौ वृषाली कदम, डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ एस व्ही ढणाल, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विशाल कुशे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पालव या विद्यार्थिनीने केले तर आभार स्टुडन्ट कौन्सिलिंगचे समन्वयक प्रा. प्रथमेश जठार यांनी मानले.