धोंडी चिंदरकर एवढे उन्मत्त होऊ नका , तुमच्या पदाची काळजी घ्या ; मंदार केणींचा पलटवार

निवडणुकीत आर्थिक गोष्टी वाटप कशा करायच्या यांचंच प्लॅनिंग तुम्ही करू शकता… विकासकामे हा तुमचा निवडणुकीतला अजेंडा नाही

मालवण | कुणाल मांजरेकर

आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना तुम्हाला घरी बसवायचं प्लॅन तयार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यावर ठाकरे गटाचे प्रवक्ते मंदार केणी यांनी जोरदार पलटवार केला आहे. चिंदरकर, आमदारांवर बोलण्याएवढी तुमची कुवत नाही, आमदार वैभव नाईक हे सुसंस्कृत चारित्र्य संपन्न आमदार आहेत. दहा वर्षे आमदार म्हणून निवडून येणे सोपे नसते. त्यांची जनतेशी नाळ जोडली गेलेली असून निवडणुकीत आर्थिक गोष्टी वाटप कशा करायच्या यांचंच प्लॅनिंग तुम्ही करू शकता. विकासकामे हा तुमचा निवडणुकीतला अजेंडा नाही. तुम्ही तुमच्या पदाची काळजी घ्या. एवढे उन्मत्त होऊ नका. जनता प्रत्येकाला संधी देते, आमदार वैभव नाईक यांना नक्कीच पालकमंत्री होण्याची संधी देईल, असे मंदार केणी यांनी म्हटले आहे.

आमदार वैभव नाईक या तळागाळातल्या जनतेशी नाळ असलेले नेते आहेत. त्यामुळे जनतेच्या मूलभूत सोयी सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील असतात. ग्रामीण भागातील अनेक प्रलंबित प्रश्न, मग ते रस्ते असो, ब्रिज असोत, वैद्यकीय प्रश्न असोत, समुद्रकिनारी असलेले बंधारे असो, सामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारे विकास कामांचा सतत पाठपुरावा करणारे आमदार म्हणून वैभव नाईक यांची ख्याती आहे. आमदार वैभव नाईक हे पहिल्या पराभवानंतरही जनतेत सक्रिय राहिले. म्हणूनच जनतेने त्यांना दहा वर्षे आमदार केले. खासदार विनायक राऊतांचा पराभव झाला तरी त्यांची कार्यालय जनतेसाठी खुली आहेत, तेही सक्रिय कार्यरत आहेत. पण तुमच्या नेत्यांनी पराभव झाल्यानंतर स्वतःची कार्यालय सुद्धा बंद केली होती, याची आठवण मंदार केणी यांनी करून दिली.

तुमचे नेते जे काही उभारताय, त्याचे भरमसाठ आकडे हे थक्क करणारे आहेत. फक्त मोदींच्या दौऱ्यावेळी केलेला खर्च, मोठमोठी उद्घाटने. परंतु मालवण तालुक्यातील बहुतांशी मोबाईल टॉवर हे बंद स्थितीत आहेत. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती बिकट आहे. पंतप्रधान सडक, मुख्यमंत्री सडक योजनेतील अपूर्ण रस्ते, रेशन दुकानावर ऑनलाइन धान्यामुळे लोकांची परवड होत आहे. गॅस सिलेंडरसाठी लोकांना तासानतास रांगेत राहावे लागते. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा अंकुश नाही. भ्रष्टाचार वाढलाय. सामान्य जनतेच्या महसूल विभागाकडील वारस तपास रखडला आहे, महसुली कामांकरिता लोकांना घिरट्या मारायला लागतात. प्रशासकीय अधिकारी वाळूचे हप्ते खाण्यात मग्न आहेत. अमली पदार्थांचा फार्स तरुण पिढीला गिळंकृत करतोय. मालवण तालुका अनैतिक धंद्यांचा अड्डा बनलाय. त्यामुळे मालवण तालुका हा व्हेंटिलेटरवर आहे, असे मंदार केणी यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!