खड्डेमय रस्त्यांविरोधात मालवणात ठाकरे शिवसेना आक्रमक ; जनआंदोलनाचा इशारा
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली सा. बां. कार्यालयाला धडक
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून हा रस्ता धोकादायक बनला आहे. तसेच मालवण शहरातील लिमये हॉस्पिटल समोरील रस्ता तसेच फोवकांडा पिंपळ येथील रस्ता देखील नादुरुस्त झाला असून याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयाला धडक दिली. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास येत्या १५ ऑगस्टला या रस्त्यावर जनआंदोलन करण्याचा इशारा हरी खोबरेकर आणि शिवसैनिकांनी दिला. त्यावर येत्या तीन चार दिवसात या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री मोदी यांच्या डिसेंबर मधील दौऱ्याच्यावेळी कसाल मालवण रस्त्यावरील आनंदव्हाळ ते गोवेकर स्टॉप या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्या पावसात हा रस्ता नादुरुस्त होऊन खडी रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्ज्याचे झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल हरी खोबरेकर यांनी केला. तर यतीन खोत यांनी मालवण बस स्थानकासमोर साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची मागणी केली. हा रस्ता गणेशचतुर्थी पूर्वी सुस्थितीत करून रस्त्यावर आलेली खडी झाडून बाजूला करण्यात यावी अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या रस्त्यावर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला. तर यतीन खोत यांनी मालवण बस स्थानक समोरील रस्त्यावर साचणाऱ्या पावसाळी पाण्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, गणेश कुडाळकर, उमेश चव्हाण, सन्मेष परब, प्रसाद आडवणकर, सुहास वालावलकर, सदा करंगुटकर, प्रवीण लुडबे, उमेश मांजरेकर, अक्षय रेवंडकर, सिद्धेश मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, निनाक्षी मेथर, सोनाली डिचवलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.