रत्नागिरी, सिंधुदुर्गातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने फुंकले रणशिंग !
सातही विधानसभा मतदार संघांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा ; ठाणे येथे बैठक
विधानसभा निवडणुकीत भाजपा कोकणातील सर्वात मोठा पक्ष ठरेल : सर्वांचा एकमुखी निर्धार
बैठकीला माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे, बाळ माने, विनय नातू, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, राजेश सावंत, केदार साठे, प्रभाकर सावंत यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित
कुणाल मांजरेकर | कोकण मिरर
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठाणे येथे भाजपाच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोअर कमिट्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत रत्नागिरी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, गुहागर, चिपळूण आणि दापोली आदी विधानसभा मतदारसंघातील कोअर कमिटी सदस्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी आणि नियोजन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
महायुती सरकारने सुरू केलेल्या जनहितकारी योजना प्रत्येक कोकणवासीयापर्यंत पोहोचवाव्यात. कोकणातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बाळगून मेहनत करा, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पार्टी हा कोकणातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा निर्धार सर्वांनी एकमुखाने केला.
या बैठकीला माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार विनय नातू, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबा परब यांचा वाढदिवस साजरा
भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक संदीप उर्फ बाबा परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री. परब यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रमोद जठार, अतुल काळसेकर, अशोक सावंत यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.