मालवण शहरातील अपूर्ण विकास कामांच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला आमरण उपोषण

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मात्र ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात नगरपलिका प्रशासनाला अपयश आले आहे. या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंदार केणी आणि यतीन खोत यांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मालवण शहरातील जिमखाना स्पोर्ट्स कॉप्लेक्स आणि स्विमिंग ट्रेनिंग सेंटर, भाजी मार्केट व गाळ्यांचे बांधकाम, मामा वरेरकर नाट्यगृहाकडील हॉल यांसारखी कामे चार वर्षे उलटून देखील पूर्णत्वास गेलेली नाहीत. आमदार वैभव नाईक, माजी खा. विनायक राऊत यांनी यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले. परंतु हे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. या प्रकल्पाबाबत संबंधित ठेकेदार अथवा प्रकल्पाला बाधा आणणाऱ्या लोकांशी कोणताही पाठपुरावा अथवा कायदेशीर कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये देखील या प्रकल्पांबाबत संभ्रमावस्था दिसून येते. त्यामुळे या विकास कामांच्या प्रकल्पाला झालेल्या दिरंगाई बाबत वाचा फोडण्यासाठी आणि जनतेने कररूपी दिलेल्या पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे मंदार केणी, यतीन खोत यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!