प्रतीक्षा संपली ! बांदिवडे – भगवंतगडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी ६.६९ कोटींचा निधी मंजूर
राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून निधी ; खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपा नेते निलेश राणेंचे विशेष प्रयत्न : तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील मसुरे, चिंदर, बांदिवडे गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असलेला भगवंतगड किल्ला नजिकच्या बांदिवडे – भगवंतगडला नवीन पुल मंजूर झाला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्यातून या पुलासाठी ६ कोटी ६९ लाख ८९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून या पुलामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. या पुलासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खा. निलेश राणेंनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
आचरा – भगवंतगड मार्गावरील या ठिकाणी ब्रीज कम बंधारा होता. मात्र या बंधाऱ्या वरून पाणी जात असल्याने ग्रामस्थांची ये जा करताना मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे याठिकाणी मोठा पूल उभारण्याची मागणी तिन्ही गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतिकडून करण्यात येत होती. अखेर भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने हा ब्रीज मंजूर करण्यात आला आहे. या ब्रीजमुळे अनेक गावांना वाहतूक सुलभ होणार आहे.