भोगवे तेरवळेवाडीकडे जाणाऱ्या “त्या” बंद पायवाटेची माजी सभापती निलेश सामंत यांनी केली पाहणी
बंधारा कम रस्त्यासाठी मंजूर निधी तातडीने खर्च होण्यासाठी पालकमंत्र्यांसह अधिकारी वर्गाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही
वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्ली खाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेल्या भोगवे तेरवळेवाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त होण्याची झाली आहे. त्यामुळे सागरी उधाणात येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असून माजी सभापती तथा भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश सामंत यांनी बुधवारी येथे भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी बंधारा कम रस्ता मंजूर असून हे काम तातडीने होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि संबंधित अधिकारी वर्गाकडे पाठपूरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
भोगवे तेरवळेवाडी या वाडीची लोकसंख्या ५० च्या आसपास आहे. मात्र समुद्राच्या किनारून जाणारी येथील पायवाट खचली असून सागरी लाटांच्या तडाख्यामुळे ही पायवाट उधाणाच्या काळात लुप्त होते. त्यामुळे या वाडीचा गावाशी संपर्क तुटतो. सागरी उधाणात या पायवाटेवर तीन ते चार फुट पाणी येते. गावात लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आहेत. त्यांनी यावेळी प्रवास कसा करायचा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबतचे वृत्त कोकण मिरर वरून प्रसिद्ध होताच माजी सभापती निलेश यांनी यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. येथे बंधारा कम रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हा निधी लवकरात लवकर खर्च करण्यासाठी पालकमंत्री तसेच अधिकारी वर्गशी चर्चा करणार असल्याचे सांगून आपण ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे ते म्हणाले. यावेळी भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत, रामा पाटकर, विस्वेश वायंगणकर, पापा नेवाळकर, सामंत, किरण जुवेकर, बाबल्या मालडकर, भाऊ नेऊरकर, रुपेश वायंगणकर आदी ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.