दसरा झाला, दिवाळी आली, रस्त्यांची दुरुस्ती कधी ; वैभव नाईक किती खोटं बोलणार ?

मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांचा सवाल ; खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

कुणाल मांजरेकर

मालवण : खड्डेमय रस्त्यांची जबाबदारी घेऊन दसऱ्या पर्यंत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आमदार वैभव नाईक यांनी दिलेली डेडलाईन हुकली आहे. यावरून मनसे तालुकाप्रमुख विनोद सांडव यांनी आ. नाईक यांच्यावर टीका केली आहे. दसरा झाला, दिवाळी आली, रस्त्यांची दुरुस्ती कधी ? असा सवाल करून आमदार अजून किती खोटं बोलणार ? असा सवाल श्री. सांडव यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात सांडव म्हणाले, धामापूर-कुडाळ, ओझर मसुरे, कोळंब- देऊळवाडा सागरी मार्ग, आडारी बेळणा, देवबाग-तारकर्ली-वायरी यासह अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालक यांचे हाल होत आहेत. मात्र आलिशान गाडीतून फिरणाऱ्या आमदार नाईक यांना सर्वसामान्य प्रवाशांची दुःख कशी कळणार ? खड्डेमय रस्त्यांनी जनता त्रस्त आहे. खड्डे, धूळ यामुळे प्रवाशांना मणक्याचे, श्वसनाचे व किडनीचे आजार उद्भवत आहेत. गोरगरीब जनता खड्ड्यात गेली आहे. असे असताना आमदार नाईक यांनी मात्र खोटी आश्वासने व जनतेची दिशाभूल याव्यतिरिक्त काहीच करायचे नाही हे धोरणच ठरवले आहे की काय ? असा सवाल सांडव यांनी उपस्थित केला आहे.

मोफत डॉक्टर सेवा तरी द्या !

आमदार वैभव नाईक यांना तालुक्यातील रस्ते करता येत नसतील तर त्यांनी आपले अपयश जाहीर करावे. ‘रस्त्यांची जबाबदारी माझी’ असे सांगत जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्य करू नये. अथवा श्वसन, मणका व किडनी या आजारावरील स्पेशालिस्ट डॉक्टर मालवण तालुक्यात शासकीय सेवेत उपलब्ध करून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणाऱ्या जनतेला आरोग्य सेवा द्यावी, असा उपरोधक टोला सांडव यांनी लगावला आहे.

आम्ही राजकारण म्हणून टीका करत नाही. जी वस्तुस्थिती आहे ती मांडत आहोत. रस्त्यांची अवस्था चांगली आहे असे जर शिवसेनेचे म्हणणे असेल तर त्यांनी जाहीर करावे, असे खुले आव्हानही सांडव यांनी तालुका शिवसेनेला दिले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!