काँग्रेस बळकट करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार ; तालुका बैठकीत निर्णय

पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन ; ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात बूथ कमिट्या स्थापन करणार

कुणाल मांजरेकर

मालवण : राष्ट्रीय कॉंग्रेस बळकट करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात बूथ कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय मालवण तालुका काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, या बूथ कमिट्या निर्माण करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, आप्पा चव्हाण, अरविंद मोंडकर, महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, सतीश कदम, जेम्स फर्नांडिस आदींचा समावेश करण्यात आला आहे.

मालवण तालुका काँग्रेसची मासिक सभा तालुका निरीक्षक इर्षाद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी वायरी येथे घेण्यात आली. तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे बैठकीची माहिती दिली आहे. या बैठकीत गेल्या ६५ वर्षातील काँग्रेस पक्षाचे काम आजच्या तरुण वर्गाला समजावून सांगण्यासाठी युवक कार्यकर्त्यांना इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच गावागावात जाऊन बूथ निहाय असलेले जुने काँग्रेस कार्यकर्ते जेष्ठ पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन त्या त्या ठिकाणी बूथ कमिटी बनविण्यासाठी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांनी सूचना करून समन्वय समिती बनविण्यात आली. येत्या दिवाळीच्या दरम्यान ग्रामीण भागातील जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ कमिट्या बनवाव्यात अशी सूचना इर्शाद शेख यांनी केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी देखील महिलांच्या उत्कर्षासाठी खाद्य पदार्थांची विक्रीसाठी स्टॉल व बचतगट, मासेविक्री करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून छोटे व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी महिलांना आर्थिक ताकद देण्यासाठी प्रयत्न करूया व त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे यांचा मेळावा देखील मालवण मध्ये भरवूया, असे सांगितले.

तर तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांसारख्या सक्षम अध्यक्षाना आपण पूर्ण वेळ देऊन तालुका पिंजून काढत ग्रामीण भागातील युवकांना देखील पक्षात घेऊन त्यांना त्यांचे हक्काचे व्यवसायिक मार्गदर्शन, भविष्यात रोजगार निर्मितीचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे अभिवचन जिल्हा युवक प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिले.

कार्यकर्ता असला तरच पदाधिकारी आहेत आणि पदाधिकारी असले तरच नेते आहेत. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे जेष्ठ कार्यकर्ते आप्पा चव्हाण यांनी सांगितले. तर येत्या मालवण नगरपरिषद निवडणूकी मध्ये ५०% तरुणांना संधी द्या, आम्ही अर्ध्या अधिक जागा निवडून आणणारच, असे युवक शहराध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी म्हटले आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन महेंद्र मांजरेकर यांनी केले तर आभार अरविंद मोंडकर यांनी मानले. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, निरीक्षक इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, आप्पा चव्हाण, सतीश कदम, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, समीर वंजारी, हेमंत कांदळकर, लक्ष्मीकांत परुळेकर, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, जिल्हा युवक सचिव योगेश्वर कुर्ले, युवक तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, युवक शहराध्यक्ष गणेश पाडगावकर, बाबा मेंडीस, श्रेयस माणगांवकर, ममता तळगावकर, हर्षदा पाटील, संगीता शिरवडेकर, प्रणित बिलये, मिनीन फर्नांडिस व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!