पेंडूर-कट्टा ग्रामीण रुग्णालय येथे विविध विकास कामांसाठी निधी मंजूर
पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी : आशिष हडकर यांची माहिती
मालवण : मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथील इमारत २० वर्षे पेक्ष्या जास्त जुनी असल्यामुळे इमारतीची मोठ्या प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. तसेच येथे बऱ्याच असुविधा असून यासंदर्भात युवा मोर्चा माजी जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक निलेश राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा येथे विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती श्री. हडकर यांनी दिली आहे.
यात ग्रामीण रुग्णालय पेंडूर-कट्टा, ता.मालवण येथील रुग्णालयीन मुख्य इमारत, औषध भांडार इमारत यावर प्रीकोटेड पत्र्याचे छप्पर तयार करणे – २७ लाख ७४ हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा या रुग्णालयाच्या इमारतीमधील उजव्या बाजूच्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती व इमारतीचे रंगरंगोटी काम करणे – ३० लाख ७० हजार, ग्रामीण रुग्णालय मालवण येथे औषधे व साहित्यासाठा ठेवणेकरिता बांधकाम करणे १० लाख ही विकास कामे मंजूर झालेली असून त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. लवकरच ही कामे प्रत्यक्ष सुरू होतील, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय कट्टा येथे डायलिसिस सेंटर सुरु होण्यासाठी आपण खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असलयाचे श्री. आशिष हडकर यांनी सांगितले.