व्हाईट कॉलर असल्याचा दिखावा करणे म्हणजे समाजसेवा नव्हे !

पालकमंत्र्यांवर पत्रप्रपंचातून टिप्पणी करणाऱ्या “त्या” डॉक्टरचा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी घेतला समाचार

मालवण : अधिकारी वर्गाच्या कृपादृष्टीमुळे स्थानिकांवर अन्याय करीत धनदांडग्यांचे लांगूनचालन करणाऱ्या वृत्ती विरोधात पालकमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर कुडाळ मधील विकासक असलेल्या डॉ. बाणावलीकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर एका पत्रातून टीका टिप्पणी केली आहे. याला भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रत्युत्तर दिले असून व्हाईट कॉलर असल्याचा दिखावा करणे म्हणजे समाजसेवा नव्हे. तुम्ही समाजासाठी केलेले एक काम दाखवा, असे आव्हान श्री. चिंदरकर यांनी दिले आहे.

दोडामार्ग सासोली मधील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास अन्याय करणाऱ्या त्या धनदांडग्या व्यक्ती विरुद्ध मी स्वतः तक्रार करून त्याला तडीपार करीन, असा इशारा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्यानंतर कुडाळ मधील विकासक असलेल्या डॉ. बाणावलीकर यांनी एका पत्रातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात पत्र प्रपंच करीत टीका टिप्पणी केली होती. त्याला श्री. चिंदरकर यांनी उत्तर दिले आहे. मुळात जनतेच्या समस्या जाणून घेत गोरगरीबांवर अन्याय करू नका, असे अधिकाऱ्यांना निर्देश देणे यामध्ये गैर काय ? तुमच्या अंगात चुक नसेल तर तुम्हाला राग येणे अनपेक्षित असून डॉक्टर कमी अन विकासक म्हणून जास्त ओळख असलेल्या व्यक्तीने पालकमंत्र्यांवर बोलल्याने आपणाला सज्जनपणाचे सर्टिफिकेट मिळेल असा समज करुन घेऊ नये.

पालकमंत्र्यावर टीका करण्यापूर्वी आपल्या जीवनातील सामाजिक काम ते एकदा जनतेला सांगा. कार्यक्षम पालकमंत्री म्हणुन रवींद्र चव्हाण हे या जिल्ह्याला परिचित आहेत. ते जिल्ह्यात राहात नसले तरी जिल्ह्यातील प्रत्येकाच्या अडी अडचणीला ते स्वतः धावून येतात. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात एक जबाबदार आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सासोलीच्या घटनेचे निमित्त काढून अन्य कुठला तरी राग त्यांच्यावर काढणे हे डॉक्टरला भूषणावह नाही. या जिल्ह्यात समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे अनेक डॉकटर आहेत, ते खऱ्या अर्थानं समाजसेवा करत आहेत. त्यानी कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवले. त्यावेळी आपण कुठे होता ? व्हाईट कॉलर असल्याचा दिखावा करणे म्हणजे समाजसेवा होत नाही. रविंद्र चव्हाण यांनी अनेक गोरगरीब जनतेला वैयक्तिकरित्या स्वतः पदरमोड करुन सहकार्य केलेलं आहे. फक्त स्वतःच कुटुंब आणि आपण एवढ्यासाठी ते जगत नाहीत. त्यामुळे आपली सामाजिक जीवनात पत किती हे ओळखूनच रवींद्र चव्हाण यांच्या सारख्या लोकनेत्यावर बोलावे, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!