स्वतःच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात स्वतःच्या गावापासून करा : श्रीकांत सावंत

“चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया” मोहिमेचा मालवण – वायरी येथे शुभारंभ 

कुणाल मांजरेकर

मालवण : मानवता विकास परिषद ही एक संस्था नसून देशव्यापी चळवळ आहे. आपला सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर याची सुरुवात आपण आपल्या गावातून केली पाहिजे. समर्थ भारत घडविण्यासाठी काळाची पावले ओळखून तन- मन- धन अर्पून काम केले पाहिजे. तरच समर्थ भारत घडू शकेल. या देशव्यापी चळवळीत सर्वांनी सहभाग घेऊन मानवता विकास परिषदेच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, असे प्रतिपादन मानवता विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मालवण वायरी येथे बोलताना केले.

मानवता विकास परिषद आणि मातृत्व आधार फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने “चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया” या मोहिमेचा शुभारंभ वायरी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी मालवण सागरी महामार्ग ते एसटी स्टँड- भरड नाका- पिंपळपार ते वायरी अशी एक रिक्षा आणि मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मधून मानवता विकास परिषदेची उद्दिष्टे व मानवता विकास परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या चळवळीविषयी प्रबोधन करण्यात आले. तर वायरी येथे चला समृद्ध सामर्थ्यवान भारत घडवूया या मोहिमेचा शुभारंभ श्रीकांत सावंत यांच्याहस्ते करण्यात आला.

आज आपण सर्वांनी स्वतः पुढाकार घेऊन कोणत्याही राजकारण्यांच्या मागे न लागता जर विकासात्मक विचारांसाठी एकत्र होऊन लढा दिल्यास खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही. जेव्हा जेव्हा मानवता विकास परिषद आणि त्यांचे सर्व सहकारी एखाद्या विधायक कामासाठी आवाज देतील, त्यावेळी नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट सर्वांच्या मागे खंबीरपणे उभी राहील, असे अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगले काम करणारे मालवणचे सुपुत्र बाबू ढोले यांना रोख रुपये दोन हजार आणि शाल, श्रीफळ देऊन बाळा गोसावी यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी मातृत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष लुडबे यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी कोरोना कालावधीमध्ये आणि समाजाभिमुख काम करणाऱ्या मालवण मधील रिक्षा चालकांचा विशेष गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आप्पा चव्हाण, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पप्पू कद्रेकर, दादा वेंगुर्लेकर, प्रभुदास आजगावकर, ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, राजा मांजरेकर, सिध्देश वराडकर, सुरेश बापार्डेकर, पंकज मसूरकर ,  मधुकर जाधव, प्रसाद पराडकर, संतोष नागवेकर,  विठू वराडकर, नीलेश लुडबे,  दिलावर शेख, जॉनी मेंडीस,  सचिन कदम, नितीन आंबेरकर,  कदाफी शेख, गजानन गावकर,  चंद्रशेखर मेस्त्री, संदेश पाताडे,  वैभव माणगावकर,  संतोष हिवाळेकर, रामा मसुरकर,  झूबेर खान आदी उपस्थित होते. यावेळी मातृत्व फाउंडेशन मालवण वायरीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून समाजसेवक बाळासाहेब गोसावी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले. तर ऐश्वर्य मांजरेकर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!