पेंडूर ग्रामीण रुग्णालयाच्या गळतीची पालकमंत्र्यांकडून दखल ; निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

ग्रामीण रुग्णालयाला गळती लागल्याप्रकरणी मनसेने वेधले होते लक्ष ; पालकमंत्र्यांची मनसे पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी

मालवण | कुणाल मांजरेकर

जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील कट्टा – पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती लागल्याचा प्रकार मनसेने सोमवारी निदर्शनास आणून दिला होता. ही इमारत जीर्ण झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याची दखल घेतली आहे. मंगळवारी जिल्ह्यात आलेल्या ना. चव्हाण यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन येथील गळतीची पाहणी केली. यावेळी या इमारतीच्या दुरुस्ती साठी आवश्यक असलेला निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

पेंडूर ग्रामीण रुग्णालयाची इमारत बरीच वर्षे जुनी असल्यामुळे या रुग्णालयाच्या स्लॅबला गळती लागली असून पुरुष कक्ष, स्त्री कक्ष आणि संपूर्ण रुग्णालयात पाणीच पाणी झाली आहे. याची माहिती मिळताच मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी सोमवारी या ठिकाणी भेट देऊन सर्व प्रश्न समजून घेतले. रुग्णालयात अस्वच्छता आणि बऱ्याच गोष्टी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्याना जाब विचारण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागास धारेवर धरल्या नंतर संबंधित अधिकारी तात्काळ त्याठिकाणी हजर झाले. येत्या दोन ते तीन दिवसात रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले होते. 

मंगळवारी जिल्हा नियोजन समिती सभेसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना याची माहिती मिळताच त्यांनी सकाळी पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन ना. चव्हाण यांनी दिले. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कट्टा माजी सरपंच सतीश वाईरकर, अभय वाईरकर, रोहित वाईरकर, उपतालुकाध्यक्ष सिद्धेश परब, कुणाल माळवदे, राकेश वाईरकर, अजित सावंत आणि इतर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3525

Leave a Reply

error: Content is protected !!