मालवण मधील “त्या” चार मुलांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करा
युवतीसेना विधानसभा समन्वयक सौ. शिल्पा खोत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांचे लक्ष वेधले
मालवण (कुणाल मांजरेकर) : स्वतःच्या जीवाची बाजी लावत मालवणच्या समुद्रात ११ मे २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवणाऱ्या चार शालेय मुलांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत यांनी मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ११ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कु. सुरेंद्र केदार गावकर उर्फ रुद्र (११ वर्ष), कु. समर्थ केदार गावकर उर्फ अंगद (९ वर्ष), कु. वरद गणेश सापळे (१२ वर्ष) आणि कु. हर्ष शिवाजी कुबल (१२ वर्ष) हे चौघेही मालवणातील नवीन जेट्टी वरून समुद्रातील पाण्यात (डायव्हिंग) सूर मारण्याचा सराव करीत होते. तेव्हा एक हिंदी भाषिक उत्तर प्रदेशातील तरुण तेथे आला आणि त्याने कपडे काढून पाण्यात उडी मारली. पण पाय जमिनीला न लागल्याने १० ते १२ फूट पाण्यात तो बुडू लागला. तेव्हा घाबरून त्याने मदतीची याचना सुरु केली. त्याच्या जवळ गेल्यास तो मिठी मारेल या भीतीने मुलांनी त्याच्या जवळ न जाता त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार आपल्या जवळील रिंग त्याच्याजवळ फेकली आणि रिंगला घट्ट पकडण्यास सांगितले. त्यानंतर या चौघांनीही त्याला खेचत किनाऱ्यावर आणले. अत्यंत भीतीमुळे गर्भगळित झाल्याने तो आपले कपडे घेऊन पळत सुटला, त्यामुळे त्याचे नाव, गाव किंवा इतर माहिती मिळू शकली नाही. या अल्पवयीन चार धाडसी मुलांनी एका बुडणाऱ्याला वाचविण्यास जीवाची पर्वा न करता जे धाडस दाखवले ते मालवण वासियांसाठी व इतर सर्वांसाठीच गर्वाची बाब आहे. या घटनेचा आवाज आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत उठवला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन या चारही मुलांना धाडसी पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी सौ. खोत यांनी या निवेदनातून केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे, नंदा सारंग, मानसी घाडीगावकर, अश्विनी आचरेकर, ज्योती तोडणकर, साक्षी आचरेकर, तन्वी भगत आदी उपस्थित होते.