भाजपा नेत्यांबाबत खोटे नरेटिव्ह सेट करण्याचे घातक षडयंत्र सुरु !
कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन हे षडयंत्र उधळून लावण्याची हीच ती वेळ ; प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांचे आवाहन
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सातत्यपूर्ण खोटे नरेटिव्ह चालवत पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी सुरू केले आहे. निवडणुकीच्या काळात भाजपा या देशाचे संविधान बदलणार असल्याचा खोटा नरेटीव विरोधकांनी चालवला. त्याला दुर्दैवाने यश मिळाले. आता भारतीय जनता पार्टीच्या एकेका नेत्यांना बदनाम करणारे नरेटीव्ह राबवले जाणार असून कार्यकर्त्यांनी सावध राहून, प्रसंगी आक्रमक होऊन हे नरेटिव्ह उधळून लावणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी केले आहे.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत सध्या असाच प्रकार सुरू आहे. जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट व्हावा या दृष्टिकोनातून बातम्या चालवल्या जात आहेत. याबाबत पंकजाताईनी दखल घेत या संबंधित चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की “एबीपी माझा वर आणि अन्य चॅनेल्सवर मी मानहानीचा दावा करणार. खात्री न करता बातम्या देऊ नये हा साधा लोकशाही ही संकेत आहे. आता बस्स!!मला साधी विधान परिषद मिळाली तर सुरू. मुद्द्यांचे बोला, असंवैधानिक आणि अनैतिक काम करणारे लोक आहेत त्यांना रोखा.. उगीच सनसनी निर्माण करण्यासाठी बातमी देऊ नका. माझ्याबाबतीत २०१४ पासून हे असेच सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असं चित्र का?”
महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात दररोज वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. यातच पूजा खेडकर यांचा भाजपशी संबंध असून त्या पंकजाताई मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याच्या अतिरंजीत बातम्या चालवून केवळ सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व टीआरपीच्या मागे धावताना एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या करिअरला बाधा आणण्याचे काम काही चॅनेल्स करत आहेत. या प्रकारामुळे पंकजाताई मुंडे संतप्त झाले असून आपल्या विधानांमधून अर्धसत्य विधाने काढून त्यातून नकारात्मक संदेश जाणाऱ्या बातम्या चालवणे, अनेक विधानांचे विपर्यास करणे, मनाला येईल ते अन्वयार्थ लावणे आदी विविध प्रकार आपल्या बाबतीत २०१४ पासून जाणीवपूर्वक सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे प्रकार अन्य नेत्यांच्या बाबतीतही भविष्यात सुरू केले जाणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधकांचे हे षडयंत्र उधळून लावण्याचे आवाहन भाजपा महाराष्ट्रचे प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी केले आहे.