कट्टा पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती
मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर आणि सहकाऱ्यांकडून पाहणी ; सा. बां. विभागाला विचारला जाब
मालवण | कुणाल मांजरेकर
सध्या जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. अशातच मालवण तालुक्यातील कट्टा – पेंडूर येथील ग्रामीण रुग्णालयाला गळती लागली आहे. बरीच वर्षे जुनी इमारत असल्यामुळे या रुग्णालयाच्या स्लॅबला गळती लागली असून पुरुष कक्ष, स्त्री कक्ष आणि संपूर्ण रुग्णालयात पाणीच पाणी झाली आहे.
दरम्यान, मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन सर्व प्रश्न समजून घेतले. रुग्णालयात अस्वच्छता आणि बऱ्याच गोष्टी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्याना जाब विचारण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागास धारेवर धरल्या नंतर संबंधित अधिकारी तात्काळ त्याठिकाणी हजर झाले. येत्या दोन ते तीन दिवसात रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी कट्टा माजी सरपंच सतीश वाईरकर, अभय वाईरकर, रोहित वाईरकर, मयुर फाटक, अजित सावंत, किशोर भोजणे, रोहित चव्हाण आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.