युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून कार्यवाही ; “तो” धोकादायक खड्डा बुजवला

देऊळवाडा रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा बुजवण्यासाठी युवक काँग्रेसने सकाळीच केले होते श्राद्ध आंदोलन

मालवण | कुणाल मांजरेकर

शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मुळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. या धोकादायक खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतानाही नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी या रस्त्यावर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने पिंडदान करून श्राद्ध आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून नगरपालिका प्रशासनाकडून दुपार नंतर हा खड्डा बुजवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.

शहरातून जाणाऱ्या मालवण- कसाल या राज्यमार्गावर देऊळवाडा येथे आडारी-देऊळवाडा- आडवण मार्ग तिठ्यावर भुयारी गटारसाठी बनविलेले चेंबर पावसाच्या पाण्याने भरून यातील पाणी रस्त्यावर येत होते. यामुळे या चेंबरच्या लगतचा रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला. येथे साचणाऱ्या पाण्यामुळे हा खड्डा दिसत नसल्याने मोटारसायकल व इतर वाहने खड्ड्यात आदळत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत असतानाही नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने युवक काँग्रेसने पूर्व इशाऱ्यानुसार या खड्ड्याच्या ठिकाणी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध घातले. खड्ड्यात केळीच्या पानावर पिंडदान करून, फुले वाहून तसेच प्रशासनाच्या विरोधातील बॅनरबाजी व घोषणाबाजी करत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. या अनोख्या आंदोलनाला रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहने चालक तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रेयस माणगावकर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, बाबा मेंडिस, लक्ष्मीकांत परुळेकर यांसह वाहनचालक व नागरिक उपस्थित होते.

नगरपलिका प्रशासनाकडून खड्डा बुजवण्याची कार्यवाही सुरु

युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर देऊळवाडा रस्त्यावरील धोकादायक बनलेला खड्डा पालिका प्रशासनाने पुढाकार घेत बुजविण्याची कार्यवाही केली. याठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पाऊस कमी झाल्यावर याठिकाणी काँक्रीटचे काम करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडून हा खड्डा बुजविण्याचे काम होणे अपेक्षित होते. मात्र नागरिक, वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुढाकार घेत तात्काळ हा खड्डा तात्पुरत्या स्वरूपात बुजविला आहे. दरम्यान कचेरी ते देऊळवाडा तसेच पुढील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन दुरवस्था होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!