जेथून राणेसाहेबांचा पराभव झाला, तेथूनच निलेश राणे निवडून येणार !

भाजपा नेते निलेश राणे यांचा निर्धार ; संवाद बैठकांचा आचरा येथून शुभारंभ

मालवण | कुणाल मांजरेकर

मागील दहा वर्षात बरेच काही शिकता आले. विधान परिषदेसाठी विचारणा झाली. पण कुणा दुसऱ्याचा अधिकार आपल्याला नको म्हणून मी नकार दिला. मी निवडून येणार तो जनतेतूनच. जिथे राणेसाहेबांचा पराभव झाला, तिथूनच निलेश राणे निवडून येणार असा निर्धार भाजपाचे कुडाळ मालवण विधानासभा प्रमुख निलेश राणे यांनी आचरा येथे बोलताना व्यक्त केला. जीव झोकून देणारे कार्यकर्ते राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाले याचा आम्हाला गर्व आहे. तुमच्या मेहनतीमुळेच सर्व निवडणूका आपण जिंकू शकलो. येत्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंना जिंकून आणायचे की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुमच्या सहकार्यावरच जनतेची सेवा करण्याची संधी मला द्या, असे आवाहनही निलेश राणे यांनी केले.

आचरा ग्रामपंचायत, लोकसभा, पदवीधर निवडणूकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानावेत, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात या उद्देशाने भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आचरा येथून करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, निलिमा सावंत, आचरा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर, चावल मुजावर, अभय भोसले, निलेश सरजोशी, संतोष गांवकर, दत्ता वराडकर यांसह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, बुथ अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या शाहिन काझी यांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर यांनीही मार्गदर्शन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!