शिल्पा खोत : मालवणचं उच्चविद्याभूषित कर्तृत्ववान व्यक्तिमत्व
आयुष्यात भविष्यातील जडणघडणीचा पाया रचताना प्रत्येक जण आपल्या पुढच्या वाटचालीचं ध्येय ठरवूनच मार्गक्रमण करतो. अनेक जण त्यामध्ये यशस्वी देखील होतात. पण काही थोडक्या व्यक्तींच्या जीवनात पुढे काय घडणाराय, हे नियतीनेच ठरवून ठेवलेलं असतं. जस जसं आपण जीवनाची मार्गक्रमणा करतो, तस तसं विधात्याच्या रचनेप्रमाणे आपल्या आयुष्यात बदल घडत जातात. यातलंच एक उदाहरण म्हणजे मालवणच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरील एक उच्च विद्याभूषित, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेल्या सौ. शिल्पा यतीन खोत ! मालवणच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाला हे नाव अगदी जवळून सुपरिचित आहे. (थोडक्यात म्हणायचं तर या नावाचा फॅन फॉलॉईंग केवळ मालवण शहरच नाही, तर तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य काही भागात असलेला दिसून येतो) आज ४ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस. यानिमित्ताने कोकण मिरर डिजिटल न्यूजच्या वतीने त्यांच्या वाटचालीचा थोडक्यात घेतलेला आढावा…..
कुणाल मांजरेकर (मालवण)
शिल्पा खोत म्हणजे पूर्वाश्रमीच्या सावंतवाडीच्या शिल्पा सुधाकर परब ! सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुधाकर विठ्ठल परब यांच्या सुकन्या. पोलीस हवालदार असलेले सुधाकर परब हे सावंतवाडीचे रहिवाशी. त्यांना तीन अपत्य. दोन मुलगे आणि एक मुलगी. यातल्या शिल्पा या दोन नंबरच्या कन्या. त्यांचं लहानपण सावंतवाडीच्या पोलीस कॉलनी मध्ये गेलं. त्यांच्या माहेरच्या घराण्याला देशसेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील, काका, चुलत भाऊ यांच्यासह बहुतेक नातेवाईक पोलीस, आर्मी, बीएसएफशी जोडले गेले आहेत. त्यामुळे आपण देखील असंच काहीतरी वेगळं करावं, असं त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं. हीच इच्छा मनाशी धरून सावंतवाडीच्या पंचम खेमराज महाविद्यालयात त्यांनी पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. तर पुणे येथील प्रसिद्ध SNDT महिला विद्यापीठात त्यांनी भूगोल विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. एअरहॉस्टेस बनून उंच भरारी घेण्याच्या स्वप्नातून त्यांनी ए.एच.ए. डिप्लोमा (एअर हॉस्टेस एकदमी मधून – केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ) पूर्ण केला. तर सावंतवाडी मधून कॉम्प्युटर आयटी चे शिक्षण देखील घेतलं. एअर लाईन क्षेत्रातच करिअर करण्याचं ध्येय घेऊन एअर लाईन्स मध्ये नोकरी मिळण्यासाठी ओबेरॉय हॉटेल, आयटीसी ग्रुप, ग्रँडहयात या पंच तारांकित हॉटेलांमध्ये हॉस्पिटिलिटीचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी वर्षभर इंटरशिप केली. आणि याचं हॉटेलांमध्ये नोकरीचा अनुभव घेतला.
याच दरम्यान, किंगफिशर एअरलाईन्स मध्ये एअर हॉस्टेस ( हवाई सुंदरी) म्हणून त्यांची निवड झाली. अडीच वर्षांच्या या काळात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. केवळ हवाई सुंदरी बनून न राहता अजून काहीतरी वेगळं करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. म्हणून देश पातळीवरील महत्वाची मानली गेलेली AVSEC ( अर्थात एअर लाईन्स सिक्युरिटी ) ची परीक्षा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ही परीक्षा एअर लाईन्स शी संबंधित महत्वाची परीक्षा मानली जाते. यामध्ये विमान हायजॅक झाल्यास अथवा दुर्घटनाग्रस्त झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या पद्धतीने नियोजन करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. कोणताही व्यक्ती जास्तीत जास्त दोनवेळा ही परीक्षा देऊ शकतो. या परीक्षेत देखील शिल्पा खोत यांनी यश मिळवले. दरम्यानच्या काळात २००८- ०९ मध्ये काही महिने त्यांनी सेंट हॉलीफेथ आणि ठाण्याच्या गुरुकुल शाळेत शिक्षक म्हणून देखील सेवा केली. यानंतर २०१२ मध्ये गोवा येथे एअर इंडियाची परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे त्यांची एअर इंडियामध्ये निवड झाली.
२०१२ मध्ये मालवण येथील युवा कार्यकर्ते यतीन परशुराम खोत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. खोत घराणं हे मालवण मधील मोठं प्रस्थ म्हणून ओळखल जातं. यतीनची आई सौ. पूनम खोत या मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. तर वडील परशुराम खोत हे व्यवसायिक म्हणून ओळखले जातं.
लग्नानंतर शिल्पा यांचं आयुष्यच बदलून गेलं. गृहिणी म्हणून त्या स्वतःच्या संसारात रमल्या. पण रक्तात देशसेवा आणि समाजकारणाचं बाळकडू भिनल्याने त्या स्वस्थ बसणाऱ्या नव्हत्या. अशावेळी महिलांसाठी आपण कायतरी वेगळं करावं जेणेकरून महिलांच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, या संकल्पनेतून शिल्पा खोत यांनी मालवणच नव्हे तर कदाचित जिल्ह्यातलं पहिलं “स्वराज्य महिला ढोलपथक” सुरु केलं. ढोल वादनाच्या क्षेत्रात महिलांचं योगदान हे मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरात दिसून यायचं. ही प्रथा सिंधुदुर्गात आणण्याचं काम शिल्पा खोत यांनी केलं. स्वराज्य ढोलपथक केवळ ढोलवादन करण्यापूरत मर्यादित न राहता या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात गरजूंना मदत देण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं. आज या स्वराज्य ढोल पथकाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहेच, पण त्या बरोबरच सामाजिक चळवळीत देखील स्वराज्य ढोलपथक आणि सामाजिक संस्थेने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. या माध्यमातून महिलांची एक मजबूत शक्ती शिल्पा खोत यांच्या मागे उभी राहिली आहे. २०१६ मध्ये यतीन खोत यांनी आपला कौटुंबिक वारसा जपत नगरपरिषदेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. यावेळी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिल्पा खोत यांनी त्यांची साथ दिली. यतीन खोत यांचं स्वतःचं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि त्याला शिल्पा खोत यांच्या माध्यमातून महिला फळीची साथ यामुळे अशक्यप्राय समजला जाणारा यतीन खोत यांचा विजय सहज सोपा झाला. यतीन खोत यांच्या नगरसेवक ते बांधकाम सभापती पदाच्या पाच वर्षांच्या काळात यतीन खोत आणि शिल्पा खोत या दाम्पत्याच्या सामाजिक सेवेचा पसारा शहराच्या मर्यादा ओलांडून तालुक्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला.
असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतो. याचप्रमाणे यतीन खोत यांच्यामागे शिल्पा खोत यांची भक्कम साथ असलेली पाहायला मिळते. राजकीय क्षेत्रात महिला आज मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. यातील काही जण नामधारी दिसून येतात. पण शिल्पा खोत या त्याला अपवाद आहेत. आज मालवणात शिल्पा खोत यांना मानणारा एक मोठा वर्ग असलेला दिसून येतो.
आज सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान क्षेत्रात शिल्पा खोत यांचं मोठं नाव आहे. तालुक्यातून कोणालाही रक्ताची गरज लागली तर ते उपलब्ध करून देण्यासाठी त्या तत्पर असतात. तसेच कोकण वाईल्ड रेस्क्यू संघटनेच्या त्या सल्लागार असून या माध्यमातून प्राणी मित्र म्हणून त्यांची वेगळी ओळख देखील निर्माण झाली आहे. मालवणात कोणत्याही पशुपक्षावर उपचाराची अथवा त्याला मदतीची गरज असली तर या संघटनेच्या माध्यमातून त्या सदैव त्याठिकाणी हजर असतात. एक शिवप्रेमी म्हणून गडकिल्ले संवर्धनात देखील त्यांचे योगदान पाहायला मिळते. शिवजयंती अथवा अन्य तत्सम दिवशी किल्ले सिंधुदुर्गवर शिवज्योत नेण्यासाठी अनेक असतात येत असतात. या मंडळामधील अनेकांचा पहिला फोन हा शिल्पा खोत यांना असतो. मालवणात आल्यावर त्यांच्या सोयी सुविधांसाठी त्या आणि यतीन खोत सदैव उपलब्ध असतात. संभाजी भिडे गुरुजी यांचे अनुयायी देखील मालवण मुक्कामी आले असता त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी शिल्पा खोत यांच्यावरच असते.
शिल्पा खोत या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत आहेत. युवती सेनेच्या त्या कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख म्हणून काम करत असून माजी खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवती सेनेच्या विस्तारक रुची राऊत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरु आहेत. पक्षाच्या माध्यमातून महिलांना सबल करण्यासाठी त्या सदैव कार्यरत असतात.
नारळ लढवणे हा क्रीडा प्रकार मालवणसह किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात खेळला जातो. मात्र पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या खेळात महिलांना पुढे आणण्याची संकल्पना शिल्पा खोत यांनी मालवणात सुरु केली. स्वराज्य ढोलपथक आणि शिल्पा यतीन खोत यांच्या माध्यमातून २०१५ मध्ये मालवणात सर्वात प्रथम महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा त्यांनी सुरु केली. आज या स्पर्धेचा पसारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरवर्षी ७०० ते ८०० महिला या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत सहभागी होतात. दोन वर्षांपूर्वी नारळी पौर्णिमेला मालवणात मोठा पाऊस झाला. त्यामुळे स्पर्धा भरवणे अशक्य होते. त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करावी लागली. त्यानंतर मागाहून ही स्पर्धा भरड दत्त मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली. यावेळी नारळी पौर्णिमा झाल्यानंतर या स्पर्धेत कोण सहभाग घेणार ? ही स्पर्धा यशस्वी होणार का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेला महिला वर्गाचा नेहमीप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून शिल्पा खोत यांची मालवणच्या महिलांमध्ये असलेली क्रेझ दिसून आली.
राजकीय क्षेत्रापेक्षा समाजकारणात अधिक रस असलेल्या शिल्पा खोत यांचा आज ४ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्ताने परमेश्वराने आपल्याला उपेक्षितांची सेवा करण्याची जास्तीत जास्त संधी देवो आणि आपल्या हातून सामाजिक वाटचालीत जास्तीत जास्त सेवाकार्य होवो, अशी इच्छा असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या भविष्यातील वाटचालीला कोकण मिरर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा !!!!