मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मालवणात शुक्रवारी ५ जुलैला मार्गदर्शन शिबीर
हॉटेल श्री महाराजा येथे आयोजन : सौ. वैष्णवी मोंडकर यांची माहिती
मालवण (कुणाल मांजरेकर) राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहीत, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या, विधवा महिलाना होणार आहे. याची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी विकास मालवण संस्था, मातृत्व वरदान फाऊंडेशनच्या माध्यमातून शुक्रवारी ५ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ४ या वेळेत हॉटेल श्री महाराजा मालवण पेट्रोलपम्प नजीक येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात उत्पन्न दाखला, वयअधिवास दाखला संदर्भात कागदपत्र पूर्ण भरून घेतले जाणार असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठी शासनाच्या वतीने तलाठी व पोलीस पाटील उपलब्ध राहणार आहेत. सदर योजनेच्या पात्र महिलांनी रेशन कार्ड, घरपत्रक उतारा, सातबारा, मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, विवाहित असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट, बँक पासबुक हे कागद घेऊन वरील वेळेत उपस्थित रहावे. अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भय करणे, महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे, अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याचा असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत हे अर्ज सादर करायचे आहेत. लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे असून वय २१ ते ६५ वर्षे असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या महिला लाभार्थीचे बँक खाते आवश्यक आहे. सदर योजना विवाहित, घटस्फोटित, विधवा, परितक्त्या, निराधार महिलासाठी शासन राबविणार आहे. ज्यांचा वय अधिवास दाखल्या ऐवजी १५ वर्षा पूर्वीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड यापैकी एक पुरावा गृहीत धरला जाणार आहे. तसेच ज्या पात्र महिलेकडे २ लाख ५० हजार उत्पन्नाचा पुरावा नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना या दाखल्यासाठी सूट देण्यात आली आहे. तसेच वरील निकषात बसणाऱ्या महिला बरोबरच कुटूंबातील एका अविवाहित महिलेला देखील वरील निकषात बसल्यास लाभ मिळणार आहे. शहरातील जास्तीत जास्त महिलांनी तसेच महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी आपल्या संपर्कातील महिलांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ. वैष्णवी मोंडकर तसेच अध्यक्ष विकास मालवण संस्था, मातुत्व वरदान फाऊंडेशन यांनी केले आहे.