मालवण तालुक्याला स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची “प्रतीक्षाच” !
उबाठा शिवसेनेने उघडकीस आणले वास्तव ; आ. नितेश राणेंनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप
येत्या काही दिवसात दवाखाना सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : हरी खोबरेकर यांचा इशारा
मालवण : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजनेतर्गत मालवण तालुक्यास दवाखाना मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात तो सुरूच झाला नसल्याचे वास्तव आज उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणले. आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांची तसेच सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आमदार राणे यांचा उबाठा सेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. दरम्यान, येत्या काही दिवसात आपला दवाखाना सुरू न झाल्यास उबाठा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला.
पावसाळी अधिवेशनात काल आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व दवाखाने सुरू असल्याचे सांगितले. यावरून आज येथील उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येथील तालुका आरोग्य विभागास भेट देत माहिती घेतली. यावेळी तालुक्यास आपला दवाखाना मंजूर आहे. मात्र तो सुरू नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. धनगे यांनी दिली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठविल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी हे दवाखाने सुरू असल्याचे जे सांगितले आहे ती बनवाबनवी आज प्रत्यक्ष उघड झाली आहे. सर्व आलबेल आहे असे सांगायचे आणि जनतेची फसवणूक करायची. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचीही त्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे याचा उबाठा सेनेच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आपला दवाखाना शासनाने तात्काळ सुरू करून सर्वसामान्य जनतेला चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याची कार्यवाही येत्या काही दिवसांत न झाल्यास उबाठा सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा श्री. खोबरेकर यांनी यावेळी दिला.