निरंजन डावखरेंचा विजय ; दीपक पाटकर यांनी शिक्षक, पदवीधरांचे मानले आभार
मालवण (कुणाल मांजरेकर) : कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयामध्ये मालवण मधील शिक्षक, पदवीधरांचा देखील मोठा वाटा असून सर्वांच्या पाठींब्यामुळे महायुतीला हा मोठा विजय मिळाला आहे. या विजयासाठी भाजपा, शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील मोठे परिश्रम या विजयासाठी झटणाऱ्या प्रत्येक घटकाचे आम्ही भाजपाच्या वतीने आभार मानतो. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितभाई शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील, अशी ग्वाही भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे.
कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मागील दहा वर्षे आमदार म्हणून काम करताना पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना भाजपा महायुती कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा सलग तिसऱ्यांदा विजय हा निश्चितच होता. फक्त त्यांना मताधिक्य किती मिळणार याची उत्सुकता होती. त्यांच्या विजयासाठी मालवण मधील शिक्षक आणी पदवीधरांनी पूर्णपणे सहकार्य केले. तर भाजपा, शिवसेनेसह महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने ही निवडणूक सोपी न घेता जीव ओतून काम केले. त्यामुळेच निरंजन डावखरे यांना मोठा विजय मिळाला आहे. मालवण शहरात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यासह भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने हिरीरीने सहभाग घेतला, असे दीपक पाटकर यांनी म्हटले आहे.