… म्हणूनच महसूलकडून अनधिकृत वाळू उपशावर कारवाईची दिखाऊगिरी !
येत्या काही दिवसात पोलखोल करणार : मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणसह जिल्ह्यातील काही भागात महसूल प्रशासनाकडून अनधिकृत वाळू उपशावर कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाई वरून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी संशय व्यक्त केला आहे. वर्षभर लाखो रुपयांचा मलिदा गोळा करून झाल्यावर शेवटचा हप्ता बुडू नये म्हणून अनधिकृत वाळू उपशावर कारवाईची दिखाऊगिरी सुरु असल्याचा आरोप श्री. वाईरकर यांनी केला आहे.
याबाबत श्री. वाईरकर यांनी म्हटले आहे की, गेली ४ ते ५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वाळू लिलाव प्रक्रिया बंद आहे. तरीही महसुल प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे वाळू तस्करी जिल्हयातील बहुतेक भागात सुरू आहे. मालवण आणि कुडाळ तालुक्यातील संबंधित गावातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या पूर्ण सहकार्याने वाळू तस्करी राजरोस सुरु आहे. मग वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी जाऊन कारवाईचा दिखाऊपणा का करत आहेत ? गेले अनेक महिने सुरु असलेली वाळू तस्करी आणि सुस्त असलेले प्रशासन यांच्या संगनमताने हे सर्व सुरु असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात गेला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारवाईचा दिखाऊपण करणाऱ्या अधीकाऱ्यांना चपराक बसावी, यासाठी त्वरित कर्ली खाडी व कालावल खाडीतील वाळूसाठ्याचे मोजमाप करुन कारवाई करण्याची मागणी मेरीटाईम बोर्ड तसेच वरिष्ठ महसूल प्रशासनकडे पाठपुराव्या सहीत करण्यात येणार असल्याचे गणेश वाईरकर यांनी म्हटले आहे.