कोकणातून उबाठा हद्दपार ; आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय भाजपा महायुतीचाच

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ; कोकण पदवीधर निवडणुकीचा मालवणात आढावा

कोकण पदवीधरचे भाजपा महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील ; माजी खा. निलेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

लोकसभा निवडणुकीत कोकणातील मतदारांनी ठाकरे गटाला नाकारले असून याठिकाणी भाजपा महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कोकणात भाजपा महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे. येत्या २६ जुन रोजी कोकण पदवीधर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे बोलताना केले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवणच्या जनतेने राणेसाहेबांना मोठे मताधिक्य देऊन विजयी केले आहे. पदवीधर निवडणुकीत देखील आ. निरंजन डाव खरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

कोकण विभाग पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपा मालवण तालुक्याची नियोजन बैठक येथील दैवज्ञ भवन येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, बाबा मोंडकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मालवण कुडाळच्या जनतेने एकदा ठरवले की काहीही करू शकते. हे लोकसभा निवडणुकीत राणेसाहेबांना मोठे मताधिक्य देऊन दाखवून दिले आहे. आता विधानपरिषद निवडणुकीत येथील मतदार मोठे मताधिक्य आ. निरंजन डावखरे यांना देतील. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल. असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, अशोक सावंत, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर यांनी विचार मांडले. यावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा देखील सादर करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!