बेपत्ता मच्छिमार किशोर चोडणेकर यांचा पोलीस प्रशासनाकडून ड्रोन’च्या मदतीने शोध
मालवण : तळाशील खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा तीन दिवस उलटले तरी शोध लागला नाही. मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या मदतीने परिसरात शोध मोहीम घेण्यात आली. मात्र बेपत्ता मच्छिमाराचा शोध लागला नाही.
दरम्यान, तीन दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ, शोध पथक, पोलीस तसेच प्रशासन यंत्रणा, कोस्ट गार्ड हॅलीकॉप्टर तसेच जिल्हा पोलीस प्रशासन टीमने ड्रोन द्वारे शोध मोहीम घेतली. शोध मोहीम सूरू आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय -५५) हे मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय – १४) वर्षे आणि खालशी धोंडीराज परब (वय ५५ वर्षे) रा. तारकर्ली यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सदर मच्छीमार आपल्या बोटीसहित सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास होडी उलटली. तीनही जण समुद्रात बुडाले. लावण्य हा पोहून बाहेर आला आणि बचावला. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह रविवारी सापडला. मात्र किशोर यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यांचा शोध तीन दिवसांपासून सूरू आहे.