आ. वैभव नाईक यांनी घेतली चोडणेकर कुटुंबियांची भेट
मालवण : तळाशील येथे खाडीपात्रात काही दिवसांपूर्वी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय- ५५ ) या मच्छीमाराचा अद्यापही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांसह चोडणेकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी चोडणेकर कुटुंबियांना त्यांनी धीर देत या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
तळाशील खाडीपात्रात मासेमारीसाठी गेले असताना मुसळधार पाऊस व वाऱ्याच्या तडाख्यात मासेमारीची होडी उलटली. यात होडीतील किशोर चोडणेकर, धोंडिराज परब, लावण्य चोडणेकर हे तिघेही पाण्यात फेकले गेले. यात लावण्य हा पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला तर चोडणेकर, परब हे दोघे बेपत्ता झाले. यात परब यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जाळ्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला तर श्री. चोडणेकर यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
मंगळवारी मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी तळाशील येथे जात चोडणेकर कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत आमदार नाईक यांनी चोडणेकर कुटुंबियांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, यतीन खोत, सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, आदित्य पेडणेकर, संजय केळुसकर, सुहास कोचरेकर, रवी कोचरेकर, सिद्धेश मांजरेकर, जयदेव लोणे, संजय जुवाटकर, हर्षद चोडणेकर, जयहरी कोचरेकर, किर्तिराज चोडणकर, निखिल पेडणेकर आदी उपस्थित होते.