मालवण शहरातील उबाठाच्या घटलेल्या मताधिक्याला आमदार, खासदारांचे दुर्लक्ष कारणीभूत !
उबाठाचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्याकडून घरचा आहेर : विकास कामांवरील प्रशासकाच्या दुर्लक्षा बाबत खा. नारायण राणेंची भेट घेणार
मालवण | कुणाल मांजरेकर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालवण शहरात महायुतीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले आहे. यावरून प्रशासकीय राजवटीच्या पूर्वी मागील पाच वर्षे मालवणचे नगराध्यक्ष पद भूषवलेल्या उबाठाचे नेते महेश कांदळगावकर यांनी माजी खा. विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर खापर फोडत त्यांना घरचा आहेर दिला आहे. आमदार, खासदारांचे जनहिताच्या प्रश्नांच्या अनुषंगाने मालवण नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभाराबाबत मवाळ धोरण असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरातील मताधिक्य घटल्याचा आरोप श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे आणि प्रशासकाच्या मनमानी कारभाराबाबत मागील दोन वर्ष माजी नगराध्यक्ष म्हणून आपण सातत्याने जाहीर भूमिका मांडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने खा. राऊत यांना त्याचा फटका बसला असून प्रशासक यांच्या विकास कामावरील दुर्लक्षाबाबत आपण खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपला मताधिक्य मिळाले. तर मालवण शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मताधिक्यामध्ये मोठी पीछेहाट झाली. त्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे जनहिताच्या अनेक प्रश्नाकडे झालेले दुर्लक्ष म्हणावे लागेल. मालवण शहरातील प्रशासकीय कारभारावर विद्यमान खासदार, आमदार यांचे मवाळ धोरणही जबाबदार म्हणावे लागेल. मागील दोन वर्ष मालवण विकास कामात प्रशासकाच्या अक्षम्य दुर्लक्षा बाबत सातत्याने त्यांच्याच पक्षाचा माजी नगराध्यक्ष म्हणून जाहीर भूमिका मांडूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. महत्वाची बाब म्हणजे जे प्रश्न मांडण्यात आले ते सार्वजनिक हिताचे. रखडलेल्या विकासकामांचे असे जनहिताचे होते. मात्र याकडे दुर्लक्षच झाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मालवण शहरातून सुमारे १२०० मते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कमी पडली. भाजपने प्रचारयंत्रणेमधे कुठलीही उणीव ठेवली नसली तरी ज्या काही अनेक कारणांमुळे मालवणमधे मताधिक्य कमी झाले, त्याला मालवण नगरपालिकेचा दोन वर्षातील मनमानी पद्धतीने सुरू असलेला प्रशासकाचा कारभार आणि त्यावर विद्यमान आमदार, खासदार यांचा नसलेला अंकुश हे कारणीभूत ठरलेले आहे.
मागील दोन वर्षापासून माजी नगराध्यक्ष म्हणून मालवणच्या विकास कामाबाबत, स्वच्छतेबाबत काम होत नसल्याचे जाहीर निवेदन करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही परिस्तिथी निर्माण झाली आहे. आमचा लोकप्रतिनिधी कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरु झाला. राजकीय घडामोडीमुळे नगरपरिषद निवडणुका पुढे पुढे ढकलत गेल्या. आजमितीस सुमारे अडीज वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. हे आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात पहिल्या प्रथम घडत आहे.
जी विकासकामे आमच्या कालावधीत सुरू झाली होती ती अद्याप पर्यंत अपूर्ण आहेत. कोरोनाचा कालावधीत काही अडचणीमुळे ही कामे मुदतीत पूर्ण झाली नाही पण त्यानंतर आता आमचा लोकप्रतिनिधी यांचा कालावधी संपून प्रशासकीय कालावधीला जवळपास अडीज वर्ष पूर्ण होत असताना अजून काम पूर्ण झालेली नाहीत. यामध्ये सुसज्ज असे भाजी मार्केटचे काम जे आमच्या कालावधीत सुरू करण्यात आले होते. यामध्ये असणाऱ्या गाळेधारकानी आमच्यावर विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका घेतली आणि गाळे खाली करुन दिले. आजपर्यंत ते व्यावसाईक अन्य ठिकाणी भाड्याने गाळे घेवून व्यवसाय करीत आहेत. परंतु अद्यापही हे काम अपूर्ण आहे. आपल्याच सफाई कर्मचारी यांच्यासाठी बीओटी तत्वावर सुरु असलेल्या इमारतीचे काम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. आपल्या कर्मचाऱ्यासाठी होणाऱ्या इमारत उभारणी मध्येही प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. नगर परिषद आवारातील अग्निशमन बिल्डिग, मामा वरेरकर या ठिकाणचा वातानुकूलित मल्टिपर्पज हॉल अशी बरीच कामे अद्याप पर्यंत पूर्ण झालेली नाहीत.
मालवण शहरातील स्वच्छता फक्त इव्हेंटपूर्ती मर्यादित असून डास फवारणी बंद करण्यात आली आहे. मध्यंतरी भाजप पक्षाच्या पदाधिकारी यांनी आवाज उठवल्यावर त्यांच्या समाधानासाठी दोन फॉगिंग मशीन खरेदी करुन दोन चार दिवस डास फवारणीचे काम करण्यात आले आणि आता त्या मशीन अडगळीत पडल्या आहेत. दरवर्षी मे महिन्यात मालवण नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली की पाणी उपसा करून पाणी शुद्धीकरण केले जात होते ते पण सध्या बंद करण्यात आले आहे. कचऱ्या पासून खत निर्मितीच्या लाखो रुपयांच्या मशिन मागील दोन वर्षापासून बंद आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली जवळपास ३० लाख किमतीचा जेसीबी धूळ खात उभा आहे. अश्या प्रकारे मालवणच्या जनतेच्या आरोग्याशीही खेळ सुरु आहे.
फोवकांडा पिंपळ या मध्यवर्ती ठिकाणी असलेला रंगीत कारंजा गेले दीड वर्ष बंद आहे. फिश मार्केट इमारत वरचा मजल्यावरील मच्छीमार बांधवाना गृहीत धरून बांधलेले गाळे आज भाडे ठरविले नसल्याने मागील अडीज वर्षापासून बंद पडून आहेत. मालवणची नळपाणी योजना, भुयारी गटार योजना या होण्यासाठी आमच्या कालावधी सातत्याने प्रयत्न करत होतो. पण मागील अडीज वर्षामध्ये बिल काढण्यापलीकडे कुठलही काम याबाबत झाल नाही. मालवण शहराच्या प्रलंबित विकासकामाबद्दल, स्वच्छतेबद्दल, चुकीच्या धोरणामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल याअश्या अनेक बाबतीत मागील दोन वर्ष सातत्याने आवाज उठवूनही प्रशासकाने याबाबत कुठलीही बाब गांभीर्याने घेतली नाही. आणि याबाबत त्यांना विद्यमान आमदार, खासदार यांच्या कडून हवी तशी समज देण्यात आली नाही.
आमदारांना पण सातत्याने खोटी आश्वासने देण्यात आली. असे असताना प्रशासका विरुद्ध आयुक्तांकडे तक्रार करणे आवश्यक असताना मवाळ धोरणाचा त्रास मालवणच्या जनतेला झाला. मालवण शहराची विकास कामे ठप्प झाली. नगरपालिकेचे लाखो रूपयाचे आर्थिक नुकसान झाले, शासकीय निधीचा अपव्यय झाला, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आणि हा सगळा रोष मालवणच्या जनतेने मताच्या रूपाने दाखवून दिला.
ज्याला मालवणच्या विकासाबद्दल काही घेणंदेण नाही अश्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे आपल्या शहराची वाट लागत असेल तर अश्यावेळी मवाळ धोरण नाही तर अश्या अधिकाऱ्यावर कारवाईची धमक दाखवली पाहिजे. पण मागच्या अडीज वर्षामध्ये अस काही झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे आता यानंतर लवकरच या मालवणच्या प्रलंबित विकास कामाबाबत आणि प्रशासकाच्या मनमानी कारभाराबाबत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची भेट घेवून त्यांना याबाबतचे निवेदन देवून या कामाबाबत पुढील आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे, अशी विनंती करणार आहे, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.