कुणी चालक देता का चालक…? मालवण तहसील कार्यालयाची परिस्थिती
तहसील कार्यालयाच्या मागणीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्षच ; नवीन वाहन तीन महिने चालकाविना
पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तरी तहसीलदारांच्या मागणीचा विचार होणार का ?
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे जुने वाहन निर्लेखित करून तीन महिन्यांपूर्वी तहसीलदारांना नवीन वाहन देण्यात आले आहे. मात्र मागील तीन महिने तहसील कार्यालय वाहनचालकाच्या प्रतीक्षेत असून येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या वाहन चालकाची सेवा मूळ आस्थापनेवर म्हणजेच मालवण येथे वर्ग करण्याच्या मागणीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मालवण तहसील कार्यालयाकडून याबाबत वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी करण्यात येत असून निदान येत्या मान्सूनच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत तरी मालवण तहसीलदारांच्या मागणीचा विचार होणार का ? असा सवाल करण्यात येत आहे.
मालवण तहसील कार्यालयाचे जुने वाहन वापरा अयोग्य बनल्याने हे वाहन निर्लेखित करण्यात आले. त्यामुळे तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी मागील काही वर्षे वाहनाविना होते. त्यामुळे याठिकाणी रुजू असलेल्या वाहनचालक बी. एस. सिंगनाथ यांची सेवा तहसील कार्यालय कुडाळ येथे वर्ग करण्यात आली आहे. नवीन वाहनासाठी मालवण तहसील कार्यालयाच्या मार्फत केलेल्या पाठपुराव्यामुळे तहसील कार्यालयासाठी शासन स्तरावरुन वाहन बोलेरो (जीप) मंजूर झालेले आहे. सदर वाहन तहसील कार्यालयास २६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्राप्त झालेले आहे. यानंतर मालवण तहसील कार्यालयाच्या वाहन चालकाची तहसिलदार कार्यालय कुडाळ येथे वर्ग केलेली सेवा मालवण कार्यालयाच्या आस्थावनेवर पूर्ववत करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली. मात्र याकडे अद्यापही दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी सध्या वाहन चालकाच्या भुमिकेत कोणीही तलाठी मंडळ अधिकारी नाहीतर कोतवाल असलेला दिसून येतो.
येत्या कालावधीत मान्सूनचे आगमन होणार आहे. मालवण तालुक्यात अनेक गावे दरवर्षी नैसर्गिक आपदग्रस्त म्हणून ओळखली जातात. नद्या नाले यांचे अतिक्रमण, समुद्र, खाडी किनारी सागरी अतिक्रमण यांचा त्रास वारंवार स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागतो. अशावेळी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पावसाळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तरी तहसीलदारांच्या मागणीचा विचार होणार का ? मालवण तालुक्याला मंजूर असलेल्या वाहन चालकाची सेवा पुन्हा मालवणात मूळ आस्थापनेवर वर्ग होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.