मालवण शहर परिसरात रात्रौ ११ ते सकाळी ६ वा. पर्यंत असणार पोलिसांचा ‘वॉच’
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती : वादावादीच्या घटना, अवैध दारू, अंमली पदार्थांच्या विक्रीवर राहणार करडी नजर
मालवण : मालवण शहर परिसरातुन गेल्या काही दिवसात पोलिसांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अनुषंगाने तसेच मागील काही दिवसात रात्रीच्या वेळी घडलेल्या काही वादाच्या घटना पाहता पोलिस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळात ही कारवाई मोहीम विशेष पथकाच्या माध्यमातून सूरू राहणार आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
रात्री उशिरा रस्त्यावर, काही नाक्यावर गर्दी गोंगाट सूरू असतो. भरधाव वेगात तसेच कर्णकर्कशपणे मोटरसायकल व अन्य वाहने चालवत फिरणारे, दारू पिऊन नशेत वाहने चालवाणारे यांच्याही काही तक्रारी गाड्यांच्या नंबरसह आल्या आहेत. कारवाई मोहिमेदरम्यान अशी वाहने दिसून आल्यास त्यावर नियमानुसार धडक कारवाई केली जाणार आहे.
मध्यरात्री पर्यत सूरू असणारी पान टपरी, चायनीज दुकाने, हॉटेल की ज्या ठिकाणी वादाच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत किंवा घडत असतील अशी ठिकाणे. या सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. चायनीज दुकाने, हॉटेल याठिकाणी कोणत्याही ग्राहकला दारू पिण्यास बसू देऊ नये. बहुतांश ठिकाणी नियमांचे पालन योग्य पद्धतीने होते. मात्र कुठल्याही ठिकाणी कोणी ग्राहक हॉटेल मध्ये येऊन दादागिरी दमदाटी पद्धतीने दारू पिण्यास बसत असेल तर हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
अवैध दारू विक्री, अमली पदार्थ विक्री काही ठिकाणी होते. याबाबतही काही गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे. तरी कोणत्याही ठिकाणी जसे की सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पर्यटन ठिकाणे व अन्य अंतर्गत मार्ग अश्या सर्व ठिकाणी अवैध दारू अथवा अन्य अमली पदार्थ घेण्याच्या उद्देशाने कोणी संशयीत व्यक्ती दिसून येत असतील तर तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहचून कारवाई करेल. असे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.