साळेल तळीच्या कामातील अनियमिततेप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई व्हावी
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
मालवण : मालवण तालुक्यातील साळेल पोकांडा येथील तळीचे नूतनीकरण कामात अत्यंत गंभीर स्वरूपात अनियमितता झालेली असून या कामावर केलेला खर्च तत्कालीन अध्यक्ष यांच्याकडून वसुलात आणणेबाबत आदेश झालेला आहे. सदर रक्कम ७ लाख ५५ हजार ७५८ एवढी असून ही रक्कम तत्कालीन अध्यक्ष कमलाकर वसंत गावडे हे जबाबदार असल्याने त्यांच्याकडून वसूल करण्याबाबत आपल्याकडून आदेश झालेले आहेत. परंतु अद्याप पर्यंत रक्कम वसुली संदर्भात कार्यवाही झालेली नाही.
या कामामध्ये शासनाच्या निधीचा अपव्यय तसेच मनमानीपणा झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर त्वरित कारवाई होऊन निधीची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी तसेच आपणाकडून झालेल्या कार्यवाहीची माहिती अवगत करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.