भाजपची विकासकामांना विरोध करण्याचीच मानसिकता ; निवडणूकीत जनता जागा दाखवून देईल !
शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचा इशारा ; भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर यांच्यावरही टीका
कुणाल मांजरेकर
मालवण : येथील भाजप पदाधिकार्यांची आतापर्यंत विकासकामांना विरोध करण्याचीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला येथील जनता त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंदबाबत शिवसेनेवर टीका करणार्या भाजप शहर प्रभारी विजय केनवडेकर यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे.
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात शेतकर्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंद बाबत भाजपच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दादागिरी करत व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत जी घटना घडली ती उत्तरप्रदेशात घडली असे म्हटले होते. याबाबत श्री. शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, लखीमपूरमध्ये भाजपच्या गृहमंत्र्याच्या मुलाने ज्या पद्धतीने शेतकर्यांच्या अंगावर गाडी घातली, यात ज्या शेतकर्यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळावा या उद्देशानेच महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालवणातही व्यापार्यांचे सहकार्य मिळाले. आम्ही गांधीगिरी पद्धतीने व्यापार्यांना आवाहन केले. त्यानुसार व्यापार्यांनी आम्हाला सहकार्य केले. या बंदबाबत भाजपच्या शहर प्रभारी विजय केनवडेकर यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी विरोधात भूमिका मांडली. त्यामुळे त्यांनी उत्तरप्रदेशमधील घटनेचे समर्थन केल्याचे दिसून आले. शेतकरी देशातला कुठलाही असो त्यांचा आवाज दाबण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. स्थानिक भाजपच्या पदाधिकार्यांनी ही घटना आपल्या राज्यात घडली नाही असे सांगत जी भूमिका मांडली त्यावरून देशाचा एक नागरिक म्हणून या पदाधिकार्यांनी भाजपची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे.
आतापर्यत येथील भाजप पदाधिकार्यांची विकासकामांना विरोध करण्याचीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे येत्या पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला येथील जनता त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल. पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र बंदबाबत शिवसेनेवर टीका करणार्या केनवडेकर यांनी कोविड काळात किती व्यापार्यांना मदत केली. दिल्लीतून विकासकामांसाठी किती पॅकेज आणले ते सांगावे. बंदबाबत ज्या व्यावसायिकांनी सहकार्य केले तसेच ज्यांनी सहकार्य नाही केले अशा सर्व व्यापार्यांचे महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही आभार मानत असल्याचे श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.