आरोग्य संवाद यात्रेचे मालवणात जंगी स्वागत ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिल्या शुभेच्छा
एकनाथ शिंदेंच्या रूपाने समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे नेतृत्व राज्याला लाभलेय : ना. राणेंकडून कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र व्यापी दौऱ्यावर निघाले ली आरोग्य संवाद यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही यात्रा कुडाळ मालवण मतदार संघात आली असता सुकळवाड येथे केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी या आरोग्य संवाद यात्रेचे स्वागत केले. महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुती सरकारचे आरोग्य विषयक काम आदर्शवत असून समाजातील शेवटच्या घटकांची काळजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याला लाभले आहेत, अशा शब्दांत नारायण राणे यांनी कौतुक केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य संवाद यात्रा सुरू आहे. शिवसेना भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महायुती सरकारच्या आरोग्य विषयक कामाचे राणेसाहेबांनी यावेळी कौतुक केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत, आरोग्यदूत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संपादक बाबा देशमाने, सचिव भगीरथ तोडकरी, सिंधुदूर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, मालवण-कुडाळ विधानसभा समन्वयक बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, राजेंद्र गावकर यांच्याशी मंत्री राणे यांनी संवाद साधला. आरोग्य संवाद यात्रा संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात दाखल झाली आहे. यानंतर ही आरोग्य संवाद यात्रा पुणे, मावळ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली.