नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमित शहा, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा
कणकवली : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मतदार संघात उपस्थिती दर्शवणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून या दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत, अशी माहिती भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आ. प्रमोद जठार यांनी दिली आहे.
कणकवली येथील नारायण राणे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी २६ एप्रिल दुपारी १२ वाजता राजापूर येथील राजीव गांधी पटांगणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. तर बुधवार १ मे रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. ३ मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरी येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.
ना. राणेंच्या उमेदवारीमुळे या मतदार संघाची ताकद वाढली आहे. पूर्वीचा राजापूर लोकसभा आणि आताच्या रत्नागिरी मतदार संघाचे नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्या यांनी नेतृत्व केलं. आता या ठिकाणी नारायण राणे हे कमळ या निशाणीवर लढत आहेत. त्यांना मतदारांनी मतदान करावे. त्यांच्या विजयाने केंद्रातील ५० लाख कोटी बजेट मधील वाटा कोकणला मिळेल. देशांमध्ये या मतदारसंघाने उंची गाठली आहे, ती पुन्हा राऊत निवडून आल्यास जिल्हा पातळीवर येईल, असे श्री .जठार यांनी सांगितले.