सावरवाडमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू ; खड्ड्याने घेतला बळी
आता तरी भोंगळ प्रशासनाला जाग येणार का ; संतप्त ग्रामस्थांचा सवाल
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण कसाल मार्गावरील वराड सावरवाड तिठ्यानजीक रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी खड्ड्यात जाऊन झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या सौ. गीता उमेश हिर्लेकर (वय 50, रा. वराड घोडवळवाडी) या रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर जखमी झालेल्या गीता हिर्लेकर यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यू नंतर संपूर्ण वराड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गीता हिर्लेकर या मनमिळाऊ व परोपकारी स्वभावामुळे सर्वत्र परिचित होत्या. तिच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासरे, सासू, दिर, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.
रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गीता हिर्लेकर या त्यांच्या पतीच्या दुचाकीवरून आपल्या पुतण्यासह कसालच्या दिशेने माहेरी जात असताना अचानक समोर वाहन आले. आणि त्यांची दुचाकी जोरदार खड्ड्यात आदळली. आणि गीता या गाडी वरून रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बांधकाम प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी
गीता हिर्लेकर यांचा अपघात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे झाला त्याच रस्त्यावर अजूनही दोन ठिकाणी असेच जीव घेणे खड्डे पडले आहेत यासाठी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करू नये ही गोष्ट गांभीर्याने घेतली गेली नाही त्यामुळेच आजची घटना एका महिलेच्या जीवावर बेतली. बांधकाम प्रशासनाच्या या बेजबाबदार व भोंगळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आता तरी या ढिम्म प्रशासनास जाग येईल का असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
तात्काळ खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन
रस्त्यावर पडलेले खड्डे आज जीवघेणे ठरत आहेत हे खड्डे प्रशासनाने तात्काळ बुजवावेत अन्यथा आचारसंहितेचा विचार न करता तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी व समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.