वैभव नाईक : निष्ठेचं दुसरं नाव !

इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. इतिहास वाचण्यापेक्षा आपण इतिहास घडवणारे व्हाव हे महत्वाचं आहे ! कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घडविलेला इतिहास हा सिंधुदुर्ग वासियांच्या चिरंतन स्मरणात राहणाराच आहे. मग तो आमने सामने आव्हानाचा प्रसंग असो, २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्याविरोधात मिळविलेला विजय असो अथवा उद्धव ठाकरेंवर आलेल्या सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी एसीबीचा दबाव झुगारून उद्धव ठाकरेंशी  एकनिष्ठ राहून संपूर्ण महाराष्ट्रात निष्ठावंत आमदार म्हणून मिळविलेला नावलौकिक असो. एकंदर महाराष्ट्राचा आणि मराठयांचा इतिहास पराक्रमाचा आहे. मराठ्यांनी प्रसंगी संघर्ष पत्कारला पण ते कधीही कुणासमोर झुकले नाहीत. त्याचप्रमाणे शिवसेनेत फुट पडल्यानंतर आ. वैभव नाईक यांना वेगवेगळी आमिषे आली. मंत्रीपदाची ऑफर आली. तुरुंगात टाकण्याची भीती दाखवण्यात आली तरी देखील वैभव नाईक महाशक्ती समोर झुकले नाहीत. संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंची साथ त्यांनी सोडली नाही. ज्यावेळी खरी निष्ठा दाखविण्याची वेळ आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे आणि त्यांच्या मावळ्यांप्रमाणे तत्वांशी ते एकनिष्ठ राहिले. म्हणूनच आजही महाराष्ट्रातील जनता आमदार वैभव नाईक यांना निष्ठेचे पाईक म्हणून ओळखते.

आमदार  वैभव नाईक यांची राजकारणाची सुरुवातच संघर्षातून झाली असून संघर्षाचे दुसरे नाव म्हणजेच वैभव नाईक आहे. राजकीय राडे, हत्या असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रक्तरंजित इतिहास असताना आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये राजकीय हत्या झाली असताना देखील पुढे होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता अन्याया विरुद्ध लढा देत  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत मोडून काढण्यासाठी आमदार वैभव नाईक रणांगणात उतरले. यावेळी अनेक वेळा त्यांना संघर्ष करावा लागला. मात्र या संघर्षाचे रुपांतर विजयातच झाले. वेगवेगळ्या माध्यमातून दडपशाही सुरु असतानाही ते मागे हटले नाहीत. पुढे त्यांनी सिंधुदुर्गातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली, मोर्चे काढले. तळागाळात जाऊन काम केले. त्यामुळे  २०१४ सालच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वैभव नाईक यांच्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जनतेने आमदार बनवून सिंधुदुर्गातील दहशत मोडून काढली. केलेल्या संघर्षाचा बाहू करत न बसता सिंधुदुर्ग जिल्ह्याला  विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. आरोग्य सुविधेची गरज ओळखून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक यांनी ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करून  घेतले. आज या महाविद्यालयात तिसरी बॅच शिक्षण घेत आहे. महिलांसाठी स्वतंत्र असे जिल्हा महिला बाल रुग्णालय कुडाळ येथे उभारले. पर्यटन वाढीच्या दृष्टीने मालवण बंदर जेटीचे  सुशोभिकरण केले. दिव्यांग बांधवांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांना सलग ७ वेळा चारचाकी स्कूटरचे मोफत वितरण करून एक अनोखा विक्रम केला. अनेक मंदिरांच्या जीर्णोधारासाठी, सभागृहासाठी  विकास निधी दिला. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे नुतनीकरण करून दगडात कोरलेले सिंहासन बनवून घेतले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले. छत्रपतींना साजेसे सिंहासन बनविल्याबद्दल उद्धवजींनी आमदार  वैभव नाईक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

विधानसभा अधिवेशनात मच्छिमार, शेतकरी, भात पिक, आंबा-काजू पिक, वाळू लिलाव त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टचारावर पोटतिडकीने प्रश्न मांडून न्याय मिळवून दिला. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी फिरकत नसताना आमदार वैभव नाईक मात्र जनतेसोबत होते. गावोगावी भेट देऊन जनतेची विचारपूस करीत होते. जनतेला आवश्यक गोष्टींची, सुविधांची पूर्तता करत होते. दरम्यान स्वतः कोराना पॉझिटिव्ह झाल्यानंतर शासकीय रुग्णालयातच उपचार घेऊन या संकटावरही त्यांनी मात केली. तौक्ते वादळ स्थितीत अनेक ठिकाणी नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असताना सलग १४ दिवस वेगवेगळ्या भागात भेट देऊन मदतकार्य केले. पूरस्थितीवेळी पाण्यातून प्रवास करून जनतेला  मदतकार्य केले. गावागावात रस्ते, पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविल्या. आमदार वैभव नाईक यांनी पदाचा कधीही बडेजाव केला नाही जनतेत मिसळून जनतेला सोबत घेऊन ते कारभार करत आले आहेत. त्यांच्या साधेपणाचे सर्वांना कुतुहलच वाटते. आमदार वैभव नाईक यांच्या कार्याप्रती जनतेच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाल्यामुळेच जनतेने त्यांना २०१९ साली दुसऱ्यांदा निवडून दिले. आताही त्यांची घोडदौड त्याच पद्धतीने सुरु आहे.

मात्र सध्याची परिस्थिती पाहता जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या भारत देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होताना दिसतेय. केंद्र सरकार ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स,एसीबी यांसारख्या स्वायत्त यंत्रणांचा वापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे. एकतर भाजपसमोर शरणागती पत्करा, अन्यथा तुरुंगात जायची तयारी ठेवा अशी भयावह परिस्थिती देशात आहे. त्याचाच एक भाग म्हणून  शिवसेना पक्षात उभी फूट पाडण्यात आली. जून २०२२ मध्ये  शिवसेना पक्षातील चाळीस आमदारांनी पक्षाशी गद्दारी  केली. मात्र आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर १५ आमदार उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. मात्र महाशक्तीला हे मान्य नव्हते. आता या पंधरा आमदारांनी सुद्धा आपल्यासमोर गुडघे टेकले पाहिजेत यासाठी महाशक्तीने हुकूमशाहीचा पुढचा अंक सुरु केला. त्याचाच एक भाग म्हणून आमदार वैभव नाईक यांना एसीबी चौकशीची नोटीस पाठवण्यात आली. महाशक्तीची इच्छा होती की एसीबीची नोटीस पाहताच वैभव नाईकांचा थरकाप उडेल आणि ते गुडघे टेकून एखाद्या शरणार्थीप्रमाणे महाशक्तीमध्ये सामील होतील. मात्र आतापर्यंत कित्येक संकटांवर मात करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी महाशक्ती समोर शरणागती पत्करली नाही आणि त्याच तडफेने आपली वादळी वाटचाल सुरु ठेवली. याचेच पडसाद उमटत आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ जनतेने कुडाळमध्ये एसीबी विरोधात मोर्चा काढत एकप्रकारे जनता विरुद्ध एसीबी असे रणशिंग फुंकले. आमदार वैभव नाईक यांच्यावर आलेल्या संकटावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत,सुषमा अंधारे,अरुण दुधवडकर, संदेश पारकर, संजय पडते, सतीश सावंत हे  सर्व नेते आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहिले.

एसीबीच्या पथकाने त्यांच्या राहत्या घराची मापे घेतली, पत्नी व सख्ख्या भावाची चौकशी केली, त्यांच्या कडून फ्लॅट खरेदी केलेल्या फ्लॅटधारकांना, विकास निधी दिलेल्या सरपंचांना चौकशीच्या नोटीसा देण्यात आल्या, तरी शिवसेनेचा हा ढाण्या वाघ एसीबीसमोर झुकला नाही. भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री असे चार चार मंत्री आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात त्यांना हरप्रकारे विरोध करत आहेत मात्र वैभव नाईक त्यांना पुरून उरल्याची वस्तुस्थिती जनता अनुभवत आहे. आमदार वैभव नाईक विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज बुलंद करत आहेतच आणि विधानसभे बाहेरही शिवसेनेशी  गद्दारी केलेल्या आमदार भरत गोगावले व आमदार संजय शिरसाट यांचाहि खरपूस समाचार घेतल्याचे सर्वांनी पाहिले. मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिले. आमदार वैभव नाईक यांनी आग्रह करून उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांचे दौरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करून शिवसेना नेते, पदाधिकारी आणि  शिवसैनिकांच्या साथीने ते  यशस्वी केले. या दौऱ्यांना कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या तीनही मतदारसंघात लाभलेला प्रतिसाद म्हणजे जनता उद्धवजींच्याच पाठीशी  राहणार असल्याचा हा संदेश होता. आमदार वैभव नाईक यांचे उल्लेखनीय कार्य, त्यांनी दाखविलेली निष्ठा, संकट हीच संधी मानून इतरांसमोर ठेवलेला आदर्श हे खरोखरच वाखण्याजोगे आहे. त्यामुळे निष्ठावंत राहिलेल्या वैभव नाईकांचे नाव शिवसेनेच्या इतिहासात पवित्र भगव्या झेंड्यासोबत मानाने फडकत आहे. अशा निष्ठावंत आणि लढवय्ये आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!