महेश कांदळगावकर यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट ; शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा
मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नुकतीच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कुडाळ येथे भेट घेतली. यावेळी मालवण शहर विकासाबाबतचे प्रश्न मांडताना या समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत प्रामुख्याने शहरात पालिका प्रशासनाचे स्वच्छतेबाबत नियोजन नाही, बायो टॉयलेट गाड्या वापराविना, सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन, डास फवारणी बंद, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, फोवकांडा पिंपळ येथील बंद फाउंटन, भाजी मार्केट तसेच मल्टीपर्पज हॉल काम बंद, मासे मार्केटवरील गाळे लिलाव नाही, या शहरातील विविध समस्याबाबत वारंवार सूचना करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत यावर योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करावी अशी मागणी केली.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी उपगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे आदी उपस्थित होते. मालवण पालिकेत सध्या कार्यरत संतोष जिरगे हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच प्रशासक पदाचा कार्यभार आहे. आमचा पालिकेमधील पाच वर्षांचा कार्यकाल २० डिसेंबर २०२१ ला संपला आहे. प्रशासकीय कार्यकाळाला आता दोन वर्ष पूर्ण होत आली. पण मागील वर्षभरात विकास कामे, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट व्यवस्था इत्यादी बाबत कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याबाबत वेळोवेळी सूचना करून, लेखी देऊनही पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. पालिकेची निवडणूका न झाल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकप्रतिनिधी कडून लोकांच्या कामाच्या अपेक्षा आहेत. आणि आमची ती नैतिकताधरणार आहेत. तरी पालिकेच्या एकंदरीत प्रशासकीय कारभाराबाबत माहिती घेऊन आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावेत. असे पत्र श्री. कांदळगावकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सादर केले. या निवेदनाच्या अनुषंगाने माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याचे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.