रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासह जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघावर भाजपचा दावा 

तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती ; मतदार संघातील मेरिट नुसारच आमची मागणी

कुडाळ – मालवणात निलेश राणेंच्याच माध्यमातून येणाऱ्या कामांना पालकमंत्र्यांकडून मिळणार मंजुरी

निवडणुका जवळ येताच आ. वैभव नाईकांकडून खोटी पत्रे देऊन फसवणूक करण्याचे धंदे सुरु

विनायक राऊत यांना पराभूत करण्यासाठी राणे साहेबांची गरज नाही ; भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ताही राऊतांचा पराभव करेल 

मालवण | कुणाल मांजरेकर

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपाची मोठी संघटनात्मक ताकद असून जिल्ह्यातील विधानसभेच्या तिन्ही मतदार संघातही आम्ही पक्षीय दृष्ट्या सरस आहोत. त्यामुळे मेरीटचा विचार करता लोकसभेसह तिन्ही विधानसभा मतदार संघात भाजपाचाच उमेदवार उभा करावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र महायुतीचा विचार करून पक्ष श्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुडाळ मालवण मतदार संघाची जबाबदारी प्रदेश भाजपाने माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे दिली आहे. निलेश राणे यांच्याच माध्यमातून येणाऱ्या कामाना राज्य शासन आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे कोणीही कार्यकर्त्याने ग्रामस्थांना विकास कामांबाबत चुकीची आश्वासने देऊ नये, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी निवडणुका येताच जनतेला पुन्हा एकदा विकासकामे मंजूर असल्याची खोटी पत्रे देण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत दहा वर्षे त्यांनी हेच धंदे केले. आता पुन्हा असेच प्रकार त्यांनी सुरु केले असून आता जनता सुज्ञ झाली आहे, त्यामुळे त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, ज्या कामांची मंजुरी झाल्याची पत्रे ते वाटत आहेत, ते सिद्ध करून दाखवावे, त्यांची जाहीर माफी मागण्यास मी तयार आहे, असे आव्हान श्री. चिंदरकर यांनी दिले आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पराभूत होण्याची भीती असल्याने ते लोकसभेला उभे राहात नसल्याचे वक्तव्य खासदार विनायक राऊत हे करीत आहेत. मात्र खा. राऊत हे निष्क्रिय ठरले असून मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांवर त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राऊतांना पराभूत करण्यासाठी राणे साहेबांची गरज नाही. भाजपचा सर्वांसामान्य कार्यकर्ता देखील त्यांचा पराभव करू शकतो. यदाकदाचित उद्या राणेसाहेब येथून उमेदवार असले तर विनायक राऊत यांना डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपडावे लागेल, असा टोला श्री. चिंदरकर यांनी लगावला आहे.

येथील भाजप कार्यालयात गुरुवारी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, बबलू राऊत, सुरेश चौकेकर, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते. श्री. चिंदरकर म्हणाले, आमदार वैभव नाईक आणि त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या कामांची यादी फिरवीत त्यांना मंजुरी मिळाली असल्याचे सांगून जनतेची फसवणूक करत आहेत. प्रत्यक्षात या कामांना मंजुरी मिळालेली नाही जर मंजुरी असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे मी त्यांची माफी मागेन. कुडाळ मालवण मतदार संघातील विकासकामे सुचविण्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांनी निलेश राणे यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे ते जी कामे सुचवतील त्यांनाच मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे आम्ही जनतेला कोणतीही विकास कामाची खोटी माहिती देणार नाही. जी कामे होणार आहेत त्याचीच माहीती तळागाळातील ग्रामस्थांना देण्याच्या सूचना केल्या आहेत. मतदार संघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला विकास निधी दिला जाणार असून कोणावरही अन्याय केला जाणार नाही. 

निलेश राणे हेच एकमेव उमेदवार – बाबा परब

राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युतीचा विजय निश्चित आहे. मालवण कुडाळ मतदार संघात युतीच्या माध्यमातून भाजप कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे हेच एकमेव उमेदवार आहेत. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजयही कार्यकर्ते व जनतेने निश्चित केला आहे. असा ठाम विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी व्यक्त केला.

विनायक राऊत हे आपल्या विरोधात नारायण राणे उभे राहू शकत नाही असे सांगत आहेत. प्रत्यक्षात राऊत निवडून आले तेव्हा त्यांची भाजप बरोबर युती होती आता ते विरोधात आहेत. त्यामुळे आता या मतदार संघावर मेरिटनुसार भाजपचाच दावा असेल. विनायक राऊत यांच्या विरोधात भाजपा जो उमेदवार देईल, तो निश्चितच निवडून येईल. पण यदाकदाचित नारायण राणे जर उमेदवार असले तर विनायक राऊत यांना डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपडावे लागेल, असा टोला चिंदरकर यांनी लगावला. पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम करतील. आमच्या समोर आता एकच लक्ष आहे पुन्हा केंद्रात मोदी यांचीच सत्ता यायला हवी. त्यांचे हात बळकट करायचे आहेत. भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला विजयी करणार आहोत, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!