अयोध्यावारीला गेलेल्या आचरा येथील राम भक्तांनी साजरा केला गंगापूजन सोहळा
उत्कृष्ट नियोजनाबद्दल भाजपा सिंधुदुर्गसह माजी खासदार निलेश राणे, प्रमोद जठार यांचे मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा उदघाटन सोहळा अलीकडेच मोठ्या उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधून भाजपच्या वतीने राम भक्तांना अयोध्या दर्शन घडवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या सहकार्याने देखील मालवण तालुक्यातील राम भक्तांना अयोध्यावारी घडवण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या आचरा येथील राम भक्तांनी नुकताच गंगापूजन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अयोध्या वारीच्या उत्कृष्ट नियोजना बद्दल भाजपा सिंधुदुर्ग तसेच माजी खासदार निलेश राणे यांचे तर प्रत्यक्ष सेवेत हजर असलेल्या माजी आमदार प्रमोद जठार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
आचरा येथील अस्मिता आचरेकर, प्रणाली पांगे जयश्री गावकर, चंदु सावंत हे अयोध्येत रामलल्ला दर्शनासाठी गेले होते. येथून दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी गंगापूजन कार्यक्रम ठेवला होता. यावेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, राजन पांगे, महेश मांजरेकर, देवेंद्र हडकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस, संतोष मिराशी, बबलू गावकर, सुरेश गावकर, यांच्यासह अन्य ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.