पैसे मिळवण्याच्या चांगल्या मार्गाने चला आणि उन्नत्ती साधा, मार्ग आम्ही दाखवतो…
कॉयर बोर्डच्या सेमिनार कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन ; अगरबत्ती, सुगंधी तेल, बांबू लागवड अशी उत्पादने घेण्याचा सल्ला
कॉयर बोर्डसाठी प्रहार भवनची जागा पूर्णतः मोफत, एकही रुपया भाडे नाही : सेक्रेटरी जे.के. शुक्ला यांच्या खुलाशाने विरोधकांचे आरोप ठरले निष्फळ
कणकवली : काथ्यापासून बनविलेल्या वस्तूंची प्रतिवर्षी १८ हजार कोटीची उलाढाल प्रती वर्षी होते. ४००० कोटीची उत्पादने देशाबाहेर परदेशात विकली जातात तर २५०० कोटीची अगरबत्ती परदेशात विकली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत आपण कोठे आहोत याचा विचार केला पाहिजे. कोकणातील जनतेने या सर्वाचा फायदा घ्यावा. उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आहेत, ती आत्मसाद करावी, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
केद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्डचा सेमिनार कार्यक्रम झाला. तर सुरुवातीला कॉयर बोर्डाच्या वस्तू प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कॉयर बोर्डचे चेअरमन डी कप्पूरामु, सेक्रेटरी जे.के. शुक्ला, मार्केटिंग झोनल ऑफिसर पी. जी. तोडकर, जनरल ऑफिसर गीता भोईर, मॅनेजर श्रीनिवास बिटलिंगु, असिस्टंट मॅनेजर गड्डम स्वामी, सेल्समन राधिका पावसकर, बाजीराव सानप, डॉ. सचिन बदाने, बन्सीधर भोई आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अपेक्षित उद्योजक घडत नाहीत. अशी खंत व्यक्त करतानाच केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २०० पेक्षा जास्त महिला कॉयरमध्ये उद्योग करण्यासाठी पुढे आल्या याचे मला समाधान आहे, असे सांगितले
नारळ आणि कॉयर त्याच्या पासून बनविण्यात येणारी उत्पादने फारच उपयोगी आहेत. अशी अनेक उत्पादने घेता येतात. त्याचा वापर बँकेत पैसे जातील असा केला पाहिजे. यापुढे तो वापर केला जाईल अशी अपेक्षा करतो. मी ओसरगावमध्ये महिला भवन उभारले. आजच्या घडीला तेथे अनेक फळांपासून उत्पादने बनवली जात आहेत. महिलाना स्वतःची उत्पादने घेता येत आहेत. त्याच पद्धतीने कॉयर क्षेत्रात अनेक उत्पादने घ्या आणि स्वावलंबी बना असे आवाहन केले.
चहा पत्ती पासून बनलेले तेल ९०० रुपये लिटर विकले जाते. बांबू पासून इथेनॉल बनविले जाणार आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करा आणि या उद्योगात सामील व्हावा. पैसा मिळविण्याच्या मार्गाने चाला. त्यासाठी चांगला मार्ग आम्ही दाखवत आहोत. त्याचा वापर करा. आणि उद्योग करा. गरिबातील गरीब माणूस आज श्रीमंत झाले. रस्त्यावर कपडे विकणाऱ्या माणसाने २ हजार करोड रुपयांचे भागभांडवल केले. तुम्ही सुध्दा अशाच पद्धतीने काम करा. नोकरीवर अवलंबून राहू नका. नोकरीत १५ हजार रुपये मिळतात, त्यावर अवलंबून राहू नका.धीरूभाई अंबानी यांनी १५०० रु.भागभांडवल घेवून व्यवसाय सुरू केला होता. आज त्या कंपनीचे ८ लक्ष कोटी रुपयांचे भागभांडवल आहे, असे यशस्वी व्हा. तुम्ही दोनशे लोक आहात.तुमची असोसिएशन केली जाईल. ज्यामुळे तुमचे जे प्रश्न असतील ते त्या माध्यमातून सोडवू. मी सुद्धा व्यावसायिक आहे. रात्रशाळेत शिकलो. छोटे मोठे व्यवसाय केले. व्यवसायिक म्हणून काम करतो. राजकारणातून पैसे मिळवत नाही. वडीलांच्या नावे तातू राणे ट्रस्ट केली आहे. त्यात जे व्याज येते त्यातून मुलांना शिक्षणासाठी,उपचारासाठी मदत करतो. जे माझ्यावर टीका करत आहेत ते एक रुपया तर जनतेसाठी खर्च करत आहेत काय ? असा सवाल नारायण राणे यांनी केला,.
कॉयर बोर्डसाठी प्रहार भवनची जागा पूर्णतः मोफत, एकही रुपया भाडे नाही – सेक्रेटरी जे.के. शुक्ला
भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्यावर विरोधक करत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. मी पदाचा फायदा उठवणारा माणूस असतो तर प्रहार भवनची ही जागा कॉयर ऑफिस साठी मोफत दिली असती काय ? असा सवाल करताच, कॉयर बोर्डचे सेक्रेटरी जे.के. शुक्ला यांनी उभे राहत मंत्री राणेसाहेब यांनी कॉयर बोर्ड उत्पादन वाढावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्याचा फायदा व्हावा. म्हणून गेली दोन वर्षे कणकवली प्रहार भवन येथे सुरू असलेल्या या कार्यालयाला दिलेली जागा एकही रुपया भाडे न घेता मोफत दिलेली आहे, असे सांगितले. यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.