निलेश राणे यांच्या नावाने केवळ चषक भरवून थांबू नका, उद्याच्या निवडणुकीत भरघोस मतदान देण्याची जबाबदारीही घ्या…

भाजपा प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ; पाट येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ तालुक्यातील पाट येथील श्री आई सातेरी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. केवळ निलेश राणे यांच्या नावाने चषक भरवून चालणार नाही. उद्या ते निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांना भरघोस मतदान देण्याची जबाबदारी सुद्धा तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने हा चषक यशस्वी झाला असं आपण म्हणू. या गावातून किमान ८० % मतदान निलेश राणे यांना झाले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा, असे दत्ता सामंत यावेळी म्हणाले.

पाट येथील श्री आई सातेरी मित्रमंडळाच्या वतीने निलेश राणे चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी दत्ता सामंत बोलत होते. यावेळी पाट उपसरपंच समिर धुरी, तेंडोली माजी सरपंच भाऊ पोतकर, पाट ग्रामपंचायत सदस्या सौ. रिया खोरजुवेकर,  सामाजिक कार्यकर्ते दादा खोरजुवेकर, शाम शेगले, मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर, रामचंद्र राऊळ, मनोज परब, गुंडू खोरजुवेकर, पाट माजी सरपंच समाधान परब, राजा सामंत यांच्यासह दत्ता सामंत मित्रमंडळ पाटचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी दत्ता सामंत यांनी श्याम शेगले यांच्यासह राजा सामंत यांचे कौतुक केले. कार्यकर्ता किती मोठा आहे, यापेक्षा तो किती प्रेमळ आहे हे महत्वाचे आहे. श्री आई सातेरी मित्रमंडळाने एवढ्या छोट्याश्या वाडीत ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पाट गावच्या या छोट्याशा वाडीत जिल्ह्यातील १६ संघ दाखल झाले आहेत. यातून या वाडीची, येथील मंदिराची माहिती सर्वदूर जाईल, असे ते म्हणाले.

तुम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र आला म्हणून पाट गावात परिवर्तन झालं आहे. सोसायटी, ग्रा. पं. निवडणुकीत आपल्याला यश मिळाले. येत्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आपले उमेदवार असतील. तर लोकसभेला आपल्या भाजपा पक्षाचा जो उमेदवार उभा असेल, या सर्वांना निवडून देऊन आपल्या गावचा विकास साध्य करण्याचे आवाहन दत्ता सामंत यांनी केले. यावेळी गावातील मंदिराला मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!