डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महीलांच्या व्यवसाय वाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे सहकार्य

ओरोस येथील ई-कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन

सिंधुनगरी (प्रतिनिधी) व्याजावर पैसे वितरीत करणे आणि मिळालेल्या व्याजातून बचत गटाचा व्यवसाय वाढवणे या मानसिकतेतून बाहेर पडून यापुढील काळामध्ये पर्यटनासारख्या विविध क्षेत्रात अनेक संधी निर्माण होत आहेत. त्या संधीचा वापर आपल्याला व्यवसायासाठी करता आला पाहिजे. बदलत्या काळात डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसाय वाढ करण्यासाठी जी काही मदत लागेल, ती सर्वतोपरी मदत जिल्हा बँक म्हणून निश्तिच करु. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढविण्यासाठी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी जिल्हा बँक म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सिंधुदुर्ग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते ११ फेब्रुवारी दोन दिवसीय ई-कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन ओरोस येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालिका श्रीम. प्रज्ञा ढवण, श्रीम.नीता राणे, संचालक गजानन गावडे, प्रभाकर सावंत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी अधिकारी राहुल टोकेकर, प्रशिक्षक सुर्यकांत माडे, प्रवीण शिंदे तसेच श्रीम. रेखाताई गायकवाड, श्रीम.श्वेता कोरगांवकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेचे अधिकारी व जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.                  

यावेळी बोलतांना मनीष दळवी म्हणाले, आज समाजामध्ये महिलांचे असलेले स्थान, त्यांचे समाजातील योगदान, त्यांचे कष्ट त्यासाठी त्यांना सन्मानाचे स्थान दिले गेले पाहिजे. आज महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणे आणि तो व्यवसाय हळु हळु पुढे घेऊन जाणे हे कठीण कार्य आज महिला करीत आहेत. पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडून वैशिष्ट्यपुर्ण व्यवसाय उभारणीसाठी व उत्पादित वस्तुला मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ मिळण्यासाठी आज डिजिटल प्लॅटफॉर्मची फार आवश्यकता आहे या ई-कॉमर्स द्वारे ग्राहक थेट तुमच्या पर्यंत येऊ शकतो आणि ही ताकद डिजिटल माध्यमातून प्राप्त होऊ शकते. विक्रीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी, उत्पादित वस्तुची जाहिरात करण्यासाठी अशा प्रकारच्या ई-कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेच्या प्रशिक्षणाची गरज आहे.                                                   

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले. तर प्रबोधिनीचे कार्यकारी अधिकारी राहुल टोकेकर यांनी कार्यशाळेची आवश्यकता व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्याविषयीच्या माहितीपटाद्वारे प्रबोधिनीच्या कामकाजाची ओळख  करुन दिली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बचत गटांचे जिल्ह्याच्या विकासात असलेल्या योगदानाबाबत विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी करून आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!