सा. बां. च्या कार्यकारी अभियंत्यांचे मुंबई दौरे नेमके कशासाठी ; जीजी उपरकरांचा सवाल
कुंभारमाठच्या हेलिपॅडच्या कामाचे खासगी इंजिनिअरकडून मोजमाप ; भ्रष्टाचाराचा आरोप
मालवण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांच्या कार्यपद्धतीवर मनसे नेते परशुराम उपरकर यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. गेले अनेक दिवस कार्यकारी अभियंता आपल्या कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध होत नाहीत. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री जिल्हा दौऱ्यावर असतानाही कार्यकारी अभियंता गैरहजर राहत असल्याने त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. यावेळी विनोद सांडव, प्रसाद गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी, आप्पा मांजरेकर, आशीष सुभेदार, मंदार नाईक, संदीप लाड, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर आदी उपस्थित होते. कोणत्याही रस्त्याची आधी कामे आणि नंतर निविदा बनवल्यामुळे कामे निकृष्ट होत आहेत. सर्वच रस्त्यांना खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामे जादा दराने करून ठराविक त्यांच्या लाडक्या ठेकेदारांना दिली जातात. अंदाजपत्रके देखील वाढवली जातात. अश्याप्रकारची कामे नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-याच्या अनुषंगाने मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने काही कामे घाईगडबडीत उरकण्यात आली होती. यात हेलिपॅड व त्याला जोडणारे रस्ते तसेच राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी चबुतरा व राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे. सदरील कामात भ्रष्टाचार अपहार झाल्याचा आमचा आरोप आहे. सदर कामाच्या अंदाजपत्रकात व प्रत्यक्ष केल्या कामात तफावत आढळून येत आहे आम्ही केलेल्या पाहणीनुसार सुमारे ७५ टक्के ज्यादा अंदाजपत्रक म्हणजेच अंदाजपत्रकाच्या फक्त २५ टक्के काम जाग्यावर दिसत आहे. शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचे आम्हाला जाणवत आहे. या प्रकरणाची माहिती कार्यकारी अभियंता आपल्या कार्यालयात आम्हाला देत नाहीत, असाही आरोप श्री. उपरकर यांनी केला आहे.
प्रत्यक्ष कामांना भेट अन् मोजमापे
मालवण मधील नागरिक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज नौसेना दिनानिमित्त मालवणमध्ये झालेल्या कामांच्या ठिकाणी भेट दिली व मोजमापे घेतली. यावेळी काही ठिकाणच्या रस्ते घुशींनी पोखरून काढण्याचेही दिसून आले आहे. एकूणच त्यांचा प्रशासकीय कारभार संशयास्पद वाटत असून सुट्टीचा दिवस सोडून अन्य वेळी कार्यालय प्रमुखाने कार्यालयात हजर राहणे बंधनकारक असून कार्यकारी अभियंता यांचा वावर पनवेल कर्जत मुंबई या शहरात असल्याचे आमचे ठाम मत आहे. पूर्वकल्पना देऊनही प्रशासकीय कामासाठी बाहेर असल्याचे कारण देत भेट देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत आहेत. कार्यकारी अभियंता यांच्या पद नियुक्तीनंतर सिंधुदुर्गात झालेल्या अन्य कामांची चौकशी व्हावी तसेच अन्य रस्त्यांच्या केलेल्या कामांची स्टफवेल सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.