भाजपा नेत्यावर बंदूक रोखून मारण्याची धमकी  

मालवण मसूरेतील घटनेमुळे खळबळ ; संबंधितावर गुन्हा दाखल

मालवण : जमीन जागेच्या वादातून मालवण पंचायत समिती माजी सदस्य तथा भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश राजाराम बागवे (वय ५७ रा.मसुरे देऊळवाडा) यांच्यावर सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन नारायण गावडे (मसुरे मर्डे बाजारपेठ) याच्यावर शस्त्र परवाना अधिनियम १५९ चे कलम ३, २५, भादवी कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी मागवणे घाटी येथे घडली.

महेश बागवे व त्यांचा मुलगा सागर, डंपरचालक ऋषिकेश नेरूरकर आणि जेसीबी ऑपरेटर हे मागवणे घाटी येथील अनिल वंजारी यांच्या सामाईक जमिनीतील माती काढत असताना अश्विन गावडे हा गाडी (एम एच ०८ एजी १२८५) घेवून त्या ठिकाणी आला. आणि माती काढण्यावरून धमकी देऊ लागला. त्यानंतर त्याने गाडीतील सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक आणून त्याच्याकडे अग्निशमन व दारूगोळा वापरण्याचे अधिकृत परवाना नसतानाही सिंगल बॅरल काडतूसाची बंदूक व काडतूस काढून मला व माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींना मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार महेश बागवे यांनी पोलीसांत दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस करत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!