छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भराडीचे आशीर्वाद घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्गात….
खा. विनायक राऊत यांची माहिती ; शिवसैनिकांची ताकद आणि जल्लोष राजकीय मंडळींना उद्या दिसेल
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर राजकीय म्हणून येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देवून त्यांना अभिवादन करण्यासाठी ते आवर्जुन येत आहेत. छत्रपतींच्या भेटीनंतर आंगणेवाडी येते आई भराई मातेचेही आशिर्वाद घेणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भराडी मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी ते मालवणमध्ये येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज झाले आहेत. आम्ही फक्त शिवसैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज आलेलो आहोत. उद्या शिवसैनिकांचा जल्लोष आणि शिवसैनिकांची ताकद सर्व राजकीय मंडळींना दिसून येईल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ४ फेब्रुवारीला होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी मालवणला भेट देत पाहणी केली. यावेळी युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, माजी नगरसेवक नितीन वाळके, सन्मेष परब, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गांवकर, युवती सेनेच्या निनाक्षी शिंदे, महिला आघाडीच्या दीपा शिंदे, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, प्रविण रेवंडकर, दत्ता पोईपकर, अक्षय रेवंडकर, चंदू खोबरेकर, सचिन लोके व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार राऊत यांचे प्रथम मालवणच्या नवीन बंदर जेटी येथे आगमन झाले. तिथून मालवण तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी यांच्या सोबत नौकेमधून त्यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. छत्रपती शिवराजेश्वर मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे त्यासंदर्भातील सर्व सोहळ्याच्या आखणीची त्यांनी पहाणी केली. खासदार विनायक राऊत यांनी शिवराजेश्वर मंदिरातील पुजारी व मानकरी यांचीही विचारपुस केली व मंदिरातील धार्मिक विधी व अन्य घटकांची विशेष विचारपुस केली. खासदार विनायक राऊत व सोबतता सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा बंदर जेटी येथे येत शासकीय विश्रामगृहात जाऊन तिथल्या सोयींचा आढावा घेतला.